धाराशिव : तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या (Tulja Bhavani Temple) एका अजब ठरावामुळे सध्या खळबळ माजली आहे. तुळजाभवानीच्या चरणी अनेकवेळा भाविक मोठ्या संख्येनं दान करतात. मात्र दान करतेवेळी दानपेटीत चुकून पडलेली वस्तू परत न देण्याचं फर्मान मंदिर प्रशासनानं काढलं आहे. याच ठरावाचा फटका एका भविकाला बसला आहे. पण या ठरावामुळे भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. 

Continues below advertisement

पिंपरी चिंचवडचे रहिवासी असलेले सूरज टिंगरे दोन महिन्यांपूर्वी मोठ्या भक्तीभावाने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले. मंदिरात पोहोचताच देवीला मनोभावे नमस्कार करत प्रार्थनाही केली. मग दक्षिणा पेटीत देवीला दान दिलं. पण दानपेटीत पैसे टाकताना त्यांच्या बोटातली सोन्याची अंगठीही चुकून दानपेटीत अपर्ण झाली. 

ही गोष्ट लक्षात आल्यावर टिंगरेंनी धाव घेतली मंदिर प्रशासनाकडे. जवळपास एक तोळ्याची ही सोन्याची अंगठी परत मिळण्यासाठी टिंगरेंनी रितसर अर्जही दाखल केला. पण दानपेटीत चुकून पडलेली वस्तू परत न देता ती दान समजली जाईल असं सांगत मंदिर समितीने सुरज टिंगरेंचा अर्जही फेटाळला आणि अंगठीही परत देण्यास नकार दिला. पण तुळजापूर मंदिर प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे भक्तमंडळींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.  

Continues below advertisement

Tuljapur Temple : 2017 सालीच ठराव संमत

दानपेटीतल्या दानासंदर्भात तुळजापूर संस्थानने 31 ऑगस्ट 2017 साली एक ठराव संमत केला आहे. त्या ठरावानुसार देवीच्या दानपेटीत भक्तांनी नजरचुकीने टाकलेल्या मौल्यवान वस्तू भक्तांना परत करण्यास मज्जाव केला गेला.

दानपेटीत भक्तांकडून चुकून पडलेल्या वस्तुंनाही दान समजलं जाईल. पण भाविकाचा मोबाईल दानपेटीत पडल्यास भाविकाच्या विनंतीनंतर, ओळख पटवून तहसीलदार आणि व्यवस्थापक प्रशासन यांच्या परवानगीनेच तो परत केला जाईल. 

Tuljapur Mandir : ठराव मागे घेण्याची मागणी

मंदिर संस्थानने केलेल्या याच ठरावानुसार दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू परत देता येणार नाही, असे लेखी उत्तर सूरज टिंगरे यांना देण्यात आले आहे. पण या निर्णयामुळे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप होत आहे. मंदिर संस्थानने हा ठराव तात्काळ रद्द करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे आणि यासाठी पुजारी मंडळ देखील मैदानात उतरलं आहे.

कोणताही भक्त देवाच्या दारात श्रद्धा आणि विशावासाने जातो. आपल्या आयुष्यातली विघ्नं दूर व्हावीत यासाठी प्रार्थना करतो. पण देवाच्या दरबारातल्या नियमांमुळेच त्याला मनस्ताप होणार असेल तर दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे देवीच्या दरबारात आलेल्या भाविकाला न्याय मिळणार की ठरावाच्या नावाखाली त्याची फसवणूक होणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.