Tanaji Sawant धाराशिव: धाराशिवमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या दोन पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. तुमचा ही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, अशी धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत व  तेरणा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांना अज्ञात व्यक्तीकडून धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली. तेरणा साखर कारखान्यासाठी ऊस वाहतुक करणाऱ्या एका  ट्रॅक्टर चालकाकडे बंद पाकीटामध्ये 100 रुपयांच्या नोटेसोबत धमकीची चिठ्ठी देण्यात आली. तेरणा कारखान्याकडे येणारा ऊस ट्रॅक्टर तेर-ढोकी रोडवर मुळेवाडी पाटीजवळ अडवत दुचाकी वरुन आलेल्या दोघांनी हे बंद पाकीट दिले. टपाल असल्याचे सांगत बंद पाकीट तेरणा कारखान्यावर सुरक्षा रक्षकाकडे देण्यास सांगितले. या धमकीच्या चिठ्ठीमध्ये तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल, असं लिहिण्यात आलं होतं.


पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल-


सदर प्रकरणानंतर तेरणा कारखान्याचे शेतकी अधिकारी मच्छिंद्र पुंड व सुनिल लगडे,संजय निपाणीकर यांनी ढोकी पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. आता ढोकी पोलीसांकडुंन घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. 


धाराशिव जिल्ह्याला मंत्रि‍पदाने दिली हुलकावणी-


देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शिंदे सरकारमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला. तसेच माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते राणाजगजीतसिंह पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचाही नंबर लागला नाही. त्यामुळे धाराशिव जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. शिंदे सरकारमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. आता धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.


एकनाथ शिंदेंनी शब्द फिरवला, सावंत समर्थक नाराज


विशेष म्हणजे विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान परंडा येथील मतदारसंघात घेतलेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना 'तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो' अशी घोषणा केली होती. आता शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे त्यांच्या समर्थकानी परांडा इथं आक्रमक होत घोषणाबाजी केली. 


संबंधित बातमी:


नागपूरहून काल बॅग घेऊन निघाले, तानाजी सावंत कुठे गेले?, नाराजीच्या चर्चांवरही मोठी माहिती समोर