मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने निरोप पाठवला आणि परांड्याचे आमदार, माजी आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत हे मुंबईत दाखल झाले. एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्याशनिवारी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. आमदार तानाजी सावंत यांनी स्वतः आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून या भेटीची माहिती दिली.

एकीकडे मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज आहेत. त्याचवेळी त्यांचे बंधू आणि सोलापूर जिल्ह्याचे शिंदे गटाचे संपर्कप्रमुख असलेल्या शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी एवढ्या तातडीने तानाजी सावंत यांना बोलवण्यामागे नेमकं कोणतं कारण आहे याची चर्चा सुरू आहे.

तपशील उघड केला नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने भेटीचा निरोप आल्याने आपण तात्काळ मुंबई गाठून त्यांची भेट घेतल्याचे तानाजी सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या भेटीदरम्यान राज्याच्या विकासाचे विविध मुद्दे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा झाल्याची माहिती सावंत यांनी दिली. मात्र, चर्चेचा नेमका तपशील त्यांनी उघड केलेला नाही.

दोन प्रमुख नेत्यांमध्ये झालेली ही दोन तासांची प्रदीर्घ चर्चा पाहता, या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झाली नसली तरी, यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

तानाजी सावंत यांचे बंधू भाजपच्या वाटेवर

तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी होती. शिवाजी सावंत हे भाजपमध्ये जाणार असल्याने तो शिंदेंना मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.

तानाजी सावंत नाराज

शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत हे या आधी राज्य सरकारमध्ये मंत्री होते. विशेष म्हणजे शिवसेनेतील बंडामध्येही त्यांचा हिरिरीने सहभाग होता. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना मंत्रिपदाची संधी न देण्यात आल्याने त्यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही त्यांनी भाग घेतला नाही. आता, त्यांच्या भावाने शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

ही बातमी वाचा: