Lok Sabha Election 2024 : महायुतीकडून जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला असून, आतापर्यंत भाजपने (BJP) राज्यातील 23 उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha Constituency) देखील भाजपच्या (
BJP) वाट्याला येण्याची शक्यता आहे. अशात भाजपकडून उस्मानाबादमध्ये (Osmanabad) खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. कारण, उस्मानाबादमधून थेट IAS अधिकाऱ्याला तिकीट देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु आहे. महायुतीत उस्मानाबाद लोकसभेबाबत येत्या 2-3 दिवसात निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता असून, सनदी अधिकारी प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi) यांच्या नावाची चर्चा आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी महायुतीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादीमध्ये (अजित पवार गट) रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तर, उस्मानाबाद लोकसभेबाबत येत्या 2-3 दिवसात महायुतीत निर्णय स्पष्ट होणार आहे. तसेच, भाजपकडून सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांच्या नावाची चर्चा होताच त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. "भाजप पक्षाने सुचना दिल्यास मी निश्चितपणे लोकसभा लढविणार आहे. सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. परदेशी यांनी बंजारा समाजासोबत होळी साजरी करताना याबाबत वक्तव्य केले आहे.
कोण आहेत प्रवीण परदेशी?
प्रवीण परदेशी हे 1985 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, त्यांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये वन, पर्यावरण, अर्थ, नगर विकास, महसूलसह अनेक महत्वाच्या विभागांमध्ये काम केले आहे. 1993मध्ये लातूरमध्ये भूकंप झाला होताम त्यावेळी परदेशी लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते. भूकंप झाला त्यावेळी परदेशी यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवलेल्या धाडसाचे त्यावेळी सर्वत्र कौतुक झाले होते. 2014 मध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच परदेशी यांना मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्त केले होते. त्यानंतर प्रवीण परदेशी यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच 2020 मध्ये प्रवीण परदेशी यांनी तडकाफडकी बदली करण्यात आली होती. प्रवीण परदेशी यांना उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू मानले जाते. त्यामुळे त्यांना उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर मैदानात?
महाविकास आघाडीत उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. तसेच, उस्मानाबादचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद पाहायला मिळते. तर, मागील काही दिवसांत स्वतः उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघाचा दौरा देखील केला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीचा निकाल...
उमेदवार नाव |
पक्ष |
मते |
मतदान टक्केवारी |
ओमराजे पवनराजे निंबाळकर |
शिवसेना |
5,96,640 |
49.2 |
राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील |
राष्ट्रवादी |
4,69,074 |
38.93 |
अर्जुन (दादा) सलगर |
वंचित बहुजन आघाडी |
98,579 |
8.18 |
नोटा |
|
10,024 |
0.83 |
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव चर्चेत...
भाजपचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहेत. कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून
उस्मानाबादमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 4 लाख 69 हजार 074 मते मिळाली होती. मात्र, पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. महायुतीत जर भाजपकडे हा मतदारसंघ आल्यास राणाजगजितसिंह पाटील यांना देखील उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
'खबरदार घरासमोर प्रचारासाठी आला तर'! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांना दार बंदी; मराठा समाज आक्रमक