धाराशिव : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापुढे बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघात (Bhum Paranda Vidhan Sabha) महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ठाकरे गटाचे रणजीत पाटील (Ranjit Patil) आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे (Rahul Mote) यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. ठाकरे गटाचे रणजीत पाटील हे परंडा विधानसभा मतदारसंघातून माघार घेणार, अशी माहिती समोर आली होती. मात्र, उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचे पुत्र रणजीत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. शिवसेना ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत परंडा मतदारसंघातून रणजीत पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली. तर परंडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे राहुल मोटे हे तानाजी सावंत यांना चांगली टक्कर देऊ शकतात, असा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील चर्चेनंतर राहुल मोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, अशा चर्चांना उधाण आले होते.
उमेदवारी मागे घेण्याची चर्चा रणजित पाटलांनी फेटाळली
आता याबाबत रणजीत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतून मी माघार घेतलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षाकडून अद्याप कुठलंही बोलणं झालेलं नाही. परंडा विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज कायम आहे., असे म्हणत उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : अखेर रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं, मविआच्या मागणीला मोठं यश