धाराशीव: विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यापुढे बंडखोरांना माघारी घेण्यासाठी राजी करण्याचे मोठे आव्हान होते. यामध्ये महाविकास आघाडीला धाराशीव जिल्ह्यात मोठे यश आले आहे. भूम परांडा मतदारसंघात (Bhum Paranda Vidhan Sabha) महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ठाकरे गट आणि शरद पवार गट दोघांकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला होता. त्यामुळे ठाकरे गटाचे रणजित पाटील (Ranjit Patil) आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे (Rahul Mote) यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आता ठाकरे गटाचे रणजित पाटील हे भूम परांडा मतदारसंघातून माघार घेणार आहेत.
त्यामुळे आता शरद पवार गटाचे राहुल मोटे हे भूम परांडा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. रणजित पाटील यांनी उमेदवारी माघारी घेण्यात शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे सांगितले जाते. रणजित पाटील यांनी शरद पवार यांच्याशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीतील वाद मिटल्याने भूम परांडा मतदारसंघात तानाजी सावंत यांच्यासमोरील आव्हान वाढू शकते. गेल्या निवडणुकीत राहुल मोटे यांनी तानाजी सावंत यांना कडवी टक्कर दिली होती.
ठाकरे गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या 65 उमेदवारांच्या पहिल्या यादीत भूम परांडा मतदारसंघातून रणजित पाटील यांना संधी देण्यात आली होती. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांचा मुलगा रणजित यांना उद्धव ठाकरे यांनी संधी दिली होती. मात्र, भूम परांडा मतदारसंघातून शरद पवार गटाचे राहुल मोटे हे तानाजी सावंत यांना चांगली टक्कर देऊ शकतात, ते जिंकून येण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा शरद पवार गटाकडून केला जात होता. परंतु, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील चर्चेनंतर आता या मतदारसंघातून राहुल मोटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
शरद पवारांनी कुणाला फोन केले?
१) पिंपरी- दीपक रोकडे
२) श्रीवर्धन- ज्ञानदेव पवार
३) अहेरी- संदीप कोरट
४) संदीप बजोरिया - यवतमाळ
५) पर्वती विधानसभा- बाबा धुमाळ
६) परंडा - रणजित पाटील (उबाठा)