धाराशिव : महाविद्यालयाच्या निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धाराशिवमध्ये घडली आहे. धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षा खरात असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. काही क्षण आधी स्टेजवर बोलत असलेली वर्षा हसत हसतच खाली पडली अन् तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

परंडा येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयात घडलेली एक दुर्दैवी घटना आहे. निरोप समारंभात भाषण करत असताना एका वर्षा खरात हिला चक्कर येऊन ती स्टेजवर कोसळली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थिनीचे बीएससीच्या वर्गात शिक्षण घेत होती. कार्यक्रमादरम्यान वर्षा स्टेजवर भाषण करत होती. हसत-हसत सर्वांशी बोलत होती ते शेवटचंच ठरलं, विनोद करत विद्यार्थ्यांना हसवत असताना अचानकच तिला भोवळ आली आणि खाली ती कोसळली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्राथमिक माहितीनुसार, वर्षाच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचे असू शकते, मात्र अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, अनेकांनी या प्रसंगावर हळहळ व्यक्त केली आहे. वर्षाच्या अकाली निधनाने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि स्थानिक नागरिक यांनाही मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमाच्या शेवटी बोलताना वर्षा म्हणाली होती, "प्रत्येक जण आपापल्या परीने जेवढं जमेल तेवढं शिकतो," असं ती म्हणाली त्यानंतर ती विनोद करत वर्गाला हसवलं होती. काही क्षणातच तिच्या आयुष्याचा असा शेवट झाला, ही बाब काळजाला चटका लावणारी आहे.

सतत वाढत चाललेले हार्ट अटॅकचे प्रमाण आणि त्याचे तरुणांमध्ये होणारे परिणाम हे चिंतेचा विषय ठरत आहेत.या दुःखद घटनेने धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली. हसता खेळता, निरोप समारंभाचे भाषण करतानाच विद्यार्थीनीने अखेरचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, वर्षा खरात हीची ओपन हार्ट सर्जरी लहानपणीच झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तर वर्षाची ओपन हार्ट सर्जरी झाल्याचा आई-वडिलांनीही सांगितल्याचे शिक्षकही म्हणाले. तिला हृदयाचा त्रास होता. मात्र शाळेत वावरत असताना कधी ती आजारी असल्याचं जाणवले नसल्याचं शिक्षकांनी सांगितलं. हसत खेळत वावरणाऱ्या वर्षाला अचानक मृत्यूने कवटाळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. परंड्याला लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील नाडी हे वर्षाचं गाव आहे. आई वडील शेती व्यवसाय करत असून घरी एक बहीण आणि भाऊ असा परिवार आहे, वर्षाच्या मृत्यूने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.