Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर (Tuljapur) तालुक्यात एका अडीच वर्षांच्या चिमुकल्याचा पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हंगरगा तुळ या गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत बालकाचे नाव समर्थ चव्हाण असून, तो अवघ्या दोन दिवसांपूर्वी मामाच्या गावाहून परतला होता.
गुरुवारी दुपारी घराजवळ खेळत असताना समर्थ चव्हाण जनावरांसाठी बांधलेल्या पाण्याच्या हौदात पडला. त्याच्यासोबत खेळत असलेल्या लहान बहिणीने आरडाओरड केल्यानंतर कुटुंबीयांनी धाव घेत त्याला हौदातून बाहेर काढले आणि तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
योग्य उपचार झाले असते तर मुलगा वाचला असता; कुटुंबीयांचा आरोप
समर्थच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप करताना सांगितले की, वेळेवर आणि योग्य उपचार मिळाले असते, तर समर्थचा जीव वाचू शकला असता. मुलाच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुलासाठी आईची तुळजाभवानी देवीकडे धाव
दरम्यान, समर्थची आई आपल्या लेकराला वाचवण्यासाठी थेट तुळजाभवानी देवीच्या मंदिराकडे धावत गेली. मंदिरापर्यंत सुमारे एक किलोमीटर धावत जाऊन देवीच्या महाद्वारावर दंडवत घालून तिने देवतेला कळवळून साद घातली. आईच्या त्या आक्रोशाने मंदिर परिसरातील नागरिक, भाविक आणि दुकानदार यांचेही डोळे पाणावले होते. या घटनेने हंगरगा तुळ गावात शोककळा पसरली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या