धाराशिव  : धाराशिव (Dharashiv) तालुक्यात बिबट्याच्या (Leopard) शोधात वन कर्मचाऱ्यांची रानोमाळ भटकंती सूरू झाली आहे. शहराच्या 7  किलोमीटर परिसरातील बागा, शेतशिवाराची कसून पाहणी करण्यात येतेय. तर वनविभागाच्या 20 जणांचे पथक या बिबट्याचा शोध घेत फिरत आहे. 


तुळजापूरच्या श्रीतुळजाभवानी मंदिराच्या पायथ्याशी सिंदफळ शिवारात बिबट्याच्या वावर असल्याचा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्यामुळे वनविभाग अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे.  वनविभागाच्या वीस जणांच्या पथकाने सिंदफळ परिसरात तब्बल सात किलोमीटरच्या परिसरातील फळ बागा, शेतामध्ये बिबट्याच्या शोधार्थ मोहिम राबवली.पण वनविभागाच्या हातात ना बिबट्या लागला, ना बिबट्याच्या कांही खानाखुणा. दोन रात्री या भागातील शेतकऱ्यांनी शेतात जाणे टाळले तर ग्रामस्थांनी अख्खी रात्र जागुन काढली. पण तरीही या बिबट्याचा काही मागोवा लागला नाही. 


आणि चर्चेला सुरुवात झाली


धाराशिव तालुक्यातील वरंवटी येथुन बिबट्या आढळल्याच्या चर्चेला सुरूवात झाली. त्यानंतर कामठा, आपसिंगा आणि आता सिंदफळ असा हा डोंगर, दाट वनराई भागात प्रामुख्याने बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. याचवेळी  वरवंटी येथे एका वासराचा तर आपसिंगा शिवारात एका शेळीचा भरदिवसा फडशा फाडल्याचे फोटे व्हायरल झाले. त्यामुळे बिबट्याचा वावर असण्याच्या शक्यतेवर ग्रामस्थांचा विश्वास दृढ होत गेला.


शेतशिवारामध्ये फोडले सुतळी बॉम्ब


श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास कर्नाटक, सोलापूर, बार्शी मार्गे भाविक मोठ्या संख्येने रात्रीच्या वेळी पायी चालत तुळजापूरला येतात. या बिबट्याच्या चर्चेमुळे या भाविकांमध्ये सध्या भीतीचे तसेच असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भाविकही यासंदर्भातली माहिती फोनवरुन दररोज घेत असल्याचं सांगण्यात येत आहे.  सिंदफळ परिसरात बिबट्या असल्याची चर्चा या भागातून मोठ्या प्रमाणात होतेय. याचपार्श्वभूमीवर रविवार (8 ऑक्टोबर) रोजी वनविभागाकडून शोधमोहीम राबवण्यात आली. त्यासाठी शेतशिवार वनविभागाने पिंजून काढले. यावेळी लपलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी सुतळी बॉम्बही मोठ्या प्रमाणात फोडण्यात आले. पण तरीही वनविभागाच्या हाती काहीच लागलं नाही. 


त्यामुळे या बिबट्या खरचं आहे का? असेल तर तो सध्या कुठे आहे, सापडत का नाही असं अनेक प्रश्न स्थानिकांच्या मनात घर करुन बसले आहेत. पण या प्रश्नांची उत्तरं ही वनविभागाची शोद मोहीम पूर्ण झाल्यानंतरच मिळतील असं म्हटलं जात आहे. पण जर या भागामध्ये बिबट्या असेल तर तो लवकर सापडावा अशी प्रार्थना सध्या गावकरी करत आहेत. 


हेही वाचा : 


Navratri 2023 : शारदीय नवरात्रौत्सव! तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर; 24 ऑक्टोबरला सिमोल्लंघन