धाराशिव : 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला बळीचा बकरा करून उमेदवारी दिली असा खळबळ जनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे कळंब धाराशिवचे तत्कालीन विधानसभेचे उमेदवार संजय निंबाळकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे जिल्हाध्यक्षानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


आमदार राणा जगजिसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार नव्हता. त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने मला बळीचा बकरा करत उमेदवारी दिली असा संजय निंबाळकर यांनी आरोप  केला आहे. त्या निवडणुकीत पक्षाने थोडीही मदत न केल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. संजय निंबाळकर हे सध्या तुळजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीचा दावा करत आहेत.


आमदार राणा जगजीत सिंह पाटील भर सभेत अश्रू अनावर


धाराशिव तुळजापूरचे भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले. हुंदके देत आमदार पाटील यांनी आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली .त्याच झालं असं की तुळजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिक्षण महर्षी सी. ना आलुरे गुरुजी (S N Alure Guruji) यांचे नाव देण्यात आलंय. या नामकारणांचा  सोहळा तुळजापूर मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आलूरे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा दिला.


पाटील आणि  आलूरे गुरुजी या दोन कुटुंबांचे पिढ्यान पिढ्या संबंध होते. त्यांच्या आठवणीने आमदार राणा जगजित सिंह पाटील यांना भर स्टेजवर रडू कोसळले.आमदार राणा पाटील  हुंदके देऊन रडले. प्रयत्न करूनही त्यांना रडू आवरत नव्हतं. त्यानंतर त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. या घटनेनंतर मात्र कार्यक्रम स्थळी कमालीची शांतता पसरली होती.