धाराशिव: बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच आता धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याचा  प्रकार समोर आला आहे. जवळगा मेसाई  गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर गुरुवारी रात्री काही गुंडांनी हल्ला केला होता. या हल्ल्यातून नामदेव निकम हे थोडक्यात बचावले असले तरी या घटनेमुळे तुळजापूर तालुका आणि गावात दहशतीचे वातावरण आहे. या हल्ल्यानंतर सरपंच नामदेव निकम यांचे कुटुंबीय प्रचंड धास्तावले आहेत.

Continues below advertisement


या सगळ्या प्रकारानंतर 'एबीपी माझा'ने नामदेव निकम यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई आणि बहिणीशी संवाद साधला. या  दोघीही नामदेव यांच्यावरील हल्ल्यामुळे घाबरल्याचे दिसून आले. नामदेव निकम यांच्या आईला बोलताना रडू कोसळले. त्यांनी थरथरत्या स्वरात सांगितले की, गावातील लाईट गेली होती. त्यामुळे शेतांमध्ये पाणी सोडता येत नव्हते. गावातील शेतकरी लाईटसाठी ओरडू लागल्यामुळे माझा मुलगा लाईट चालू करायला गेला होता. तिथून परतत असताना त्याच्यावर हल्ला झाला. मी तेव्हा झोपले होते. माझ्या नातेवाईकांनी येऊन मला उठवले आणि झालेला प्रकार सांगितल्याचे नामदेव निकम यांच्या आईने म्हटले. हे सगळे सांगताना निकम यांच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. या प्रकारामुळे त्यांना आपल्या मुलाबद्दल प्रचंड चिंता वाटत आहे. निकम यांची मुलं आणि पत्नी शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत. त्यांच्या आई गावी राहतात, असेही त्यांच्या आईने सांगितले.


नेमकं काय घडलं?


नामदेव निकम हे गुरुवारी रात्री बारुळ गावातून आपल्या कारने जवळगा मेसाई गावाकडे परतत होते. त्यावेळी रस्त्यात असताना त्यांच्या कारच्या दोन्ही बाजुंनी अचानक दोन बाईक आल्या. या बाईकस्वारांनी निकम यांच्या गाडीच्या काचा फोडून आतमध्ये पेट्रोलने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकल्या. तरीही नामदेव निकम यांनी गाडीचा वेग कमी केला नाही. तेव्हा बाईकवरील गुंडांनी निकम यांच्या कारच्या काचांवर अंडी फेकली. त्यामुळे त्यांना पुढील काहीही दिसेनासे झाले. त्यामुळे त्यांना गाडी थांबवावी लागली. त्यावेळी गुंडांनी त्यांच्या गाडीवर आणखी पेट्रोल टाकून गाडीसकट नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, नामदेव निकम कसेबसे गाडीतून बाहेर पडले. यामध्ये नामदेव निकम आणि त्यांचा एक सहकारी जखमी झाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून या भागात गुंड दहशत माजवत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. प्राथमिक तपासात हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाला असल्याची माहिती समोर आली. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गृह विभाग आणि पोलीस दल विरोधकांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


तुळजापूर तालुक्यातील सरपंच हल्ल्यातील आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल; पोलिसांचं आश्वासन


तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर रात्री झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी तुळजापूर पोलिसात मनुष्यवादाचा प्रयत्न या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपीवर कारवाई करून योग्य  तपास केला जाईल असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले आहे



आणखी वाचा


मस्साजोगनंतर आता तुळजापूरच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, गुंडांकडून पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न