Dhananjay Munde: गेल्या दीड महिन्यापासून राज्यात सुरू असलेल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्येनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मीक कराड यांची धनंजय मुंडेंशी आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप वारंवार केला जातोय. या प्रकरणाचा मूळ सूत्रधारच मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आहेत असा आरोप करत मंत्रिपदाचा राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. दरम्यान बीडचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या सगळ्या प्रकरणावर गप्प असणारे मंत्री धनंजय मुंडे अखेर या प्रकरणावर बोलले आहेत. वाल्मीक करडांशी (Walmik Karad) आर्थिक संबंध असल्याचा आरोप तसेच या प्रकरणातील सर्व आरोप खोटे असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांनी आरोप धुडकावून लावलेत. हा केवळ बदनामीचा प्रयत्न असल्याचाही ते म्हणालेत.
मस्साजोग प्रकरणात खंडणी ते सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूप्रकरणात वाल्मीक कराडांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे अडचणीत येणार असल्याची चर्चा होती. गेल्या दोन दिवसांपासून धनंजय मुंडे परळीत आहेत. परळी वैजनाथाची पूजा केल्यानंतर ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. आता पालकमंत्री पदाच्या यादीतून बीडच पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवारांना देण्यात आल्यानंतर माध्यमांशी बोलताना वाल्मीक कराड यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण असल्याचे आरोप धुडकावत हा केवळ बदनामीचा प्रयत्न असल्याचं धनंजय मुंडे म्हणालेत.
या प्रकरणातील सर्व आरोप खोटे: धनंजय मुंडे
'जे आरोप करण्यात आले आहेत, त्यातील एक तरी आरोप त्यांनी खरा करून दाखवावा. विनाकारण मला त्यावर आता बोलायचं नाही. ज्यावेळेस बोलायचे त्यावेळेस मी बोलायला कमी पडणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला, मातीतल्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे. माझी एवढीच विनंती सर्वांना मला बदनाम करायचं करा, आणखीन कोणाला बदनाम करायचे करा. माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैजनाथनगरीला बदनाम करू नका हीच माझी विनंती आहे. वाल्मीक कराडांची असणाऱ्या आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपांवर हे सगळं खोटंय. सर्व आरोप खोटे आहेत.' असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आरोप धुडकवलेत. पालकमंत्रीपदासाठी अजित पवारांना जबाबदारी देण्यासाठी मीच पक्षाला आणि अजितदादांना सांगितलं असल्याचंही ते म्हणालेत. पुण्याचा विकास केला तसा बीडचाही विकास दादा करतील असंही मुंडे म्हणालेत.
हेही वाचा: