चंद्रपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) स्वप्नातील भारतात देश 2027 पर्यंत कुष्ठरोग मुक्त झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला मोठं कार्य करायचे आहे. रुग्णांच्या संख्येत घट होत असली मात्र आपलं टास्क अजून मोठं आहे. त्यासाठी संस्थांची मदत घेणं आवश्यक आहे. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्किल डेव्हलपमेंट सेंटरसाठी अतिशय चांगलं काम केलं आहे. मात्र 2012 नंतर कुष्ठरोगाच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या अनुदानात कुठलीही वाढ केलेली नाही, त्यामुळे या अनुदानात प्रति व्यक्ति 2200 रूपयांवरून 6000 करण्याची मी घोषणा याठिकाणी करतो, तसेच  पुनर्वसन अनुदानात बदल करून 2000 ची रक्कम ही 6000 रुपये इतकी करत असल्याची ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.  यासह कॉर्पस फंडमध्ये 10 कोटी रुपये देण्याची घोषणा ही त्यांनी केली आहे. 

चंद्रपूरच्या वरोरा तालुक्यातील आनंदवन प्रकल्पाला आज (9 फेब्रूवारी) 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित आनंदवन मित्र मेळावा कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. तसेच या कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील उपस्थिती लावली होती.  महारोगी सेवा समितीच्या  वतीने आयोजित 75 वर्षपूर्ती कृतज्ञता मित्र मेळाव्या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही भरघोष घोषणा केली आहे.  

आनंदवन हे मानवतेचं मंदिर - देवेंद्र फडणवीस 

आनंदवन हे मानवतेचं मंदिर आहे. मानवी संवेदानांची व्याख्या ही बाबा आमटे यांच्या कार्यातून दिसून येते. खऱ्या अर्थाने ज्यावेळी बाबांनी हे कार्य सुरू केलं त्या वेळी हे कार्य अतिशय कठीण होतं, शिवाय कुष्ठरोग्याबद्दल समाजात तिरस्काराची भावना होती. मात्र आज या प्रकल्पासोबत स्वतः ला जोडल्या गेल्याचे समाधान वाटतंय. चंद्रपूर सारख्या मागास, आदिवासी बहुल भागात हे कार्य 75 वर्षापूर्वी हातात घेतलं आणि आज हे कार्य विविध क्षेत्रामध्ये मोठं आणि बहुमोल स्वरूपाचे झाले आहे. त्यासाठी विकास भाऊ, प्रकाश भाऊ यांनी त्याचा सातत्याने विस्तार केला आहे.

सरकारच्या अनेक निर्णयांचा अश्या संस्थांना फटका बसतो, मात्र..

आनंदवन ने प्रत्येक क्षेत्रात काम केलं, हजारो तरुणांना समाजाबद्दल उत्तरदायी केलं. आनंदवन ने केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशात एक संवेदना तयार केली आहे. सरकारच्या अनेक निर्णयांचा अश्या संस्थांना फटका बसतो, मात्र आनंदवन कधी विचलित झालं नाही. विविध क्षेत्रातील लोकांना आनंदवनने आकृष्ट केलंय. मूलभूत समाजसेवा काय आहे हे बघायचं असेल तर आनंदवनचं काम सर्वांनी पाहायला पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

हे ही वाचा