मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला असून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवली सराटी येथून मुंबईकडे कूच केली आहे. सणासुदीच्या काळात आंदोलन टाळावे, सरकारसोबत चर्चा करावी, अशी विनंती सरकारकडून करण्यात आली. मात्र, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून, आंदोलनाची दिशा आता थेट मुंबईकडे वळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या निर्णयाला सत्तेतील आणि विरोधी पक्षातील काही आमदार, खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सरकारची देखील कोंडी झाल्याची चर्चा आहे.
अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे (Dare Village) गावचा दौरा अचानक रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे गणेशत्सवासाठी दरवर्षी दरे या आपल्या मूळगावी जात असतात. मात्र हा दौरा रद्द होण्यामागील नेमकं कारण काय हे अद्याप कळू शकलेलं नाही. परिणामी नियोजित असलेला दौरा अचानक रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.
एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा रद्द, संघर्षयोद्ध्याशी सरकार पुन्हा चर्चा करणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दरे गावचा दौरा अचानक रद्द झाल्याने या बाबत मनोज जरांगे यांचे सुरु असलेलं आंदोलन देखील कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी सरकार पुन्हा चर्चा करणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. तर मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं असताना शिंदेंनी आजपर्यंत त्यावर मौन बाळगल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री असताना जरांगेंची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असताना शिंदे आता गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंत घेणार मनोज जरांगे-पाटील यांची भेट
दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असलेले मनोज जरांगे-पाटील यांची मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत आज मनोज जरांगे-पाटील यांची भेट घेणार असल्याची माहीती समोर आली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या सोबत राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांची भेट अहिल्यानगर किंवा पुणे येथे होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत थोड्याच वेळात अहिल्यानगर येथे पोहचणार असल्याचेही सांगितलं जातंय.
इतर महत्वाच्या बातम्या