Coronavirus In Maharashtra मुंबई: महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. यात मुंबई, पुणे, ठाणे शहरातील रुग्णांची संख्या वाढतेय. या दरम्यान काल (24 मे) ठाण्यातील 21 वर्षीय युवकाचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर गेल्या 24 तासात राज्यात दोघांचा मृत्यूची घटना घडली असून या घटनेनंतर सर्व नागरिकांना सतर्क आणि सावध राहण्याचं अपील करण्यात आलं आहे. तर संबंधित प्रशासनानेही त्या अनुषंगाने खबरदारीचे सर्व उपाय योजले आहे. अशातच आता महाराष्ट्रातील कोविड-19 ची 25 मे 2025 रोजीपर्यंत अपडेटेट माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या किती?
या वर्षातील जानेवारीपासून महाराष्ट्रात एकूण 7, 144 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या कालावधीत एकूण 257 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण 87 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात एकूण 93 नवीन कोविड रुग्ण आढळले आहेत. यापैकी 47 मुंबईत, 30 पुण्यात, 7 नवी मुंबईत, 3 ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आणि 6 नागपूर महानगरपालिका क्षेत्रात असून सध्या राज्यात एकूण 166 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जानेवारीपासून महाराष्ट्रात एकूण 4 रुग्णांचा मृत्यू
पुढे आलेल्या माहितीनुसार, सर्व संक्रमित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत आणि कोणालाही गंभीर लक्षणे नाहीत. जानेवारीपासून महाराष्ट्रात कोविड संसर्गामुळे एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी एकाला हायपोकॅल्सेमिक झटके असलेले नेफ्रोटिक सिंड्रोम होते. तर दुसऱ्याला कर्करोग होता. तिसऱ्याला स्ट्रोक (सेरेब्रोव्हस्कुलर रोग) होता आणि चौथा रुग्ण गंभीर मधुमेहाने ग्रस्त होता. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षेच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन
दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रसह देशातील इतर राज्यात कोरोना संक्रमण वाढलं आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी मास्कचा वापर करावा असा सल्ला दिला जात आहे. याशिवाय कोरोनाची लक्षण आढळून आल्यास तातडीनं तपासणी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी प्रशासनानं सर्व नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या