Nagpur Violance : नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची 'सत्यशोधन समिती' आज (22 मार्च) नागपूरला भेट देणार आहे. या भेटीमधून हिंसाचार घडला त्या भागाची पाहणी करणार आहे. तसेच पोलीस, प्रशासन, नागरिक यांच्याशी चर्चा करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसची समिती प्रयत्न करणार आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचाराचे (Nagpur Violance) कारणे काय? त्या पाठीमागे कोण जबाबदार आहेत? याचा शोध घ्यायचा प्रयत्न काँग्रेसची ही सत्यशोधन समिती करणार आहे.
दरम्यान नागपूरच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केलेल्या या सत्यशोधन समितीच्या नियुक्तीवर भाजपने सवाल उपस्थित केलाय. तसेच अकोला पश्चिम मतदार संघाचे आमदार साजिद खान पठाण यांच्यावर निशाणा साधलाय. अकोल्याच्या दंगलीतील मुख्य आरोपी साजिद खान पठाण, आता नागपूरच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार, असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपने उपस्थित केलाय.
साजिद खान पठाण यांच्या नियुक्तीवरुन भाजपचा खोचक सवाल
नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कार्यालयीन आदेश काढत नागपूर इथे भेट देत दंगलीची स्थिती जाणून घेण्यासाठी तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी 7 नेत्यांची निवड केली आहे. मात्र यामध्ये अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांचे देखील नियुक्ती केलेली आहे. याच नियुक्तीवर आता भाजपने सवाल उपस्थित केलाय. 'BJP महाराष्ट्र' या फेसबुक अकाउंटवरून भाजपने थेट काँग्रेसला टार्गेट केलंय.
एका दंगलीचा मुख्य आरोपी आता दुसऱ्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार?
नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसच्या वतीने 'सत्यशोधन समिती' स्थापन करण्यात आली आहे. ही समिती नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागांची पाहणी करणार आहे. तसेच या समितीचा अहवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या समितीमध्ये माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, हुसेन दलवाई, साजिद पठाण, विकास ठाकरे, प्रफुल गुडधे यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी परवानगी दिल्यास हिंसाचार ग्रस्त प्रभावित भाग असलेला महाल, भालदारपुरा परिसरात समिती जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या समितीत साजिद खान पठाण यांच्या नियुक्तीवर, 'एका दंगलीचा मुख्य आरोपी आता दुसऱ्या दंगलीत शांतता प्रस्थापित करणार' असा सवाल भाजपने उपस्थित केलाय. हा काँग्रेसचा अजब कारनामा असल्याचे या पोस्टमधून मधून म्हटले आहे. साजिद खान पठाण हे काँग्रेसच्या शांतता समितीचे सदस्य नियुक्तीवरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा