CNG PNG Price : अलीकडच्या काळात नैसर्गिक वायूच्या किमती 50 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत सीएनजी-पीएनजीच्या (CNG PNG) दरात कपात होण्याची अपेक्षा वाढू लागली आहे. सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात करून महागाईत भरडल्या जाणाऱ्या जनतेला दिलासा मिळेल का, याकडे लक्ष लागले आहे. सीएनजी-पीएनजी दराच्या मुद्याबाबत गुरुवारी संसदेत सरकारला प्रश्नही विचारण्यात आला. सरकार सीएनजी-पीएनजीच्या दरात कपातीचा निर्णय मागे घेणार आहे का? असा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यात आला.
संसदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पेट्रोलियम राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले की, सीएनजी आणि पीएनजीच्या किमती पीएनजीआरबीने (PNGRB) नियुक्त केलेल्या अधिकृत शहर गॅस वितरण कंपन्यांकडून गॅसची खरेदी किंमत, कर आणि इतर घटक लक्षात घेऊन निश्चित केल्या जातात. भारत सरकारने सीएनजी-पीएनजीच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. जानेवारी 2021 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीत 327 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर भारतात सीएनजीच्या किमतीत केवळ 84 टक्क्यांनी वाढ झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पेट्रोलियम राज्यमंत्र्यांनी सांगितले की, किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी 2013-14 च्या तुलनेत घरगुती गॅसचे वाटप 250 टक्क्यांनी वाढले आहे. तसेच, CNG-PNG च्या मागणीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी घरगुती वापरासाठी असलेला गॅस हा वीज आणि इतर अनावश्यक क्षेत्रांमधून घरगुती वापरासाठी वळवण्यात आला आहे. सरकार घरगुती गॅस वाटपात CNG-PNG विभागाला प्राधान्य देत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. गॅसच्या किमती जवळपास 3.2 डॉलर प्रति युनिटवर आल्या आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये प्रति युनिट 10 डॉलरच्यावर गेल्या होत्या. 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलियम मंत्रालय नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेईल तेव्हा गॅसच्या किमतींमध्ये मोठी कपात होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सीएनजी-पीएनजीच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे. रशियाच्या युक्रेमवर झालेल्या हल्ल्यानंतर नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी उसळी आली होती.
महानगर गॅसकडून सीएनजी दरात कपात
महागाईमुळे बजेट बिघडलेल्या मुंबईकरांना महानगर गॅसने मोठा दिलासा दिला. बुधवारपासून सीएनजीच्या दरात (CNG Price Mumbai) प्रतिकिलो 2.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मुंबईत सीएनजी नवीन किंमती नुसार 87 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजीचे दर हे 44 टक्क्यांनी स्वस्त असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे.