मुंबई : शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणारे आणि शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आंदोलन करणाऱ्यांशी आम्ही चर्चा करणार नाही. खऱ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला आम्ही आजही तयार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


शेतकरी हिताचे निर्णय घेऊनही शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजवली जात आहे. शेतकऱ्यांनी गेल्या सरकारचे 15 वर्ष पाहिले आहेत, आणि या सरकारचे अडीच वर्ष पाहिले आहेत. शेतकऱ्यांना सर्व परिस्थितीची जाणीव आहे. शेतकरीच त्यांना त्यांची जागा दाखवतील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

दरम्यान पुणतांबा येथील शेतकरी समितीने नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर या समितीने संप मागे घेण्याची घोषणा केली. मात्र समितीच्या या निर्णयानंतर शेतकरी आंदोलनात फूट पडली आणि या समितीचा निर्णय मान्य नसल्याचं सांगत संप सुरुच ठेवला. शेतकरी संपाचा आज पाचवा दिवस आहे.

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • हमीभावापेक्षा कमी भाव देणे हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात येईल. येत्या अधिवेशनात त्याबाबत कायदा करण्यात येणार आहे.

  • राज्य कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.

  • दुधाच्या भावासंदर्भात तटस्थ निरीक्षक नेमण्यासंदर्भात विचार

  • वाढीव वीज बिलाचा पुनर्विचार

  • थकीत बिलाचे व्याज आणि दंडव्याज रद्द करण्याचा निर्णय

  • शीतगृह साखळी निर्माण करणार

  • नाशवंत शेतमालासाठी प्रक्रिया उद्योग आणणार

  • शेतकऱ्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले जातील, मात्र गुंडावरचे गुन्हे मागे घेतले जाणार नाही


मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीला शेतकऱ्यांकडून कोण कोण हजर होतं?

  • जयाजीराव सूर्यवंशी

  • धनंजय जाधव

  • शांताराम कुंजूर

  • सतीश कानावडे

  • विजय काकडे

  • अड. कमल सावंत

  • सीमा नरोदे

  • संदीप गीते

  • शंकर दरेकर

  • योगेश रायते

  • अजित नवले