Thane traffic: ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे 1 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याचे कारण म्हणजे मुंब्रा बायपास आणि साकेत पुलावरील दुरुस्तीचे काम. त्यामुळे शहरातील अंतर्गत वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहन चालकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील वाढत्या वाहतूक समस्येवर पोलिस, परिवहन आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली, त्यामध्ये त्यांनी या सूचना केल्या.


'मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती द्या'


मुंब्रा बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. मुंब्रा बाह्यवळण रस्त्याच्या कामाला गती देतानाच त्याच्या दुभाजकादरम्यान झाडे लावण्याचे तसेच त्यांच्या दोन्ही बाजू आधुनिक पद्धतीने सुशोभिकरण करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. 


वाहतूक नियमनासाठी अतिरिक्त वॉर्डन


पुढील महिनाभर शहरातील वाहतूक नियमनाच्या कामावर असलेला ताण पाहता ठाणे महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहतूक पोलिसांना अतिरिक्त वाहतूक वॉर्डन उपलब्ध करून द्यावे तसेच मुंबईतून अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घ्यावी असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले. 


सर्व्हिस रोडचा थांब्यासाठी वापर करणाऱ्या वाहनांवर कारवाई


ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारितील घोडबंदर मार्गावरील गायमुख- वाघबीळ मार्गावरील साईड पट्ट्यांचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले असून ते वेळेत पूर्ण करावे. तसेच घोडबंदर रोड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरील सर्व्हिस रोड आणि महमार्ग दोन्ही वापरात आणावे अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व्हिस रोडचा पार्किंगसाठी होणारा वापर थांबवून वाहनांवर कारवाई करावी.  त्याचप्रमाणे बसेस, ट्रक आणि स्कूल बसच्या पार्किंगसाठी खारेगाव टोलनाका तसेच पूर्व द्रुतगती माहामार्गालगतच्या मोकळ्या जागांचा वापर करावा असे निर्देश दिले. 


निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई


कामे पूर्ण करताना कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे काम खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.  पावसाळ्यात रस्त्यावर पडणारा छोटा खड्डा देखील जीवघेणा ठरतो त्यामुळे आपल्या अखत्यारितील रस्त्यांवर खड्डे राहणार नाहीत याची जबाबदारी त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यांची असेल. यात हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकांना उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा देणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असून ती आपण सर्वांनी पार पडायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.