ABP Majha Impact : धनगर विद्यार्थ्यांच्या शाळांमधील गैरप्रकरणी कारवाई छत्रपती संभाजीनगर मधील दोन शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये गॅलक्सी इंटरनॅशनल स्कूल आणि स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावेंकडून दोषी शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. तत्कालीन सहाय्यक संचालकांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती एबीपी माझाने दाखवली होती. अनेक संस्थाचालकांनी कागदोपत्री मुले दाखवून सरकारकडून पैसे उचलले होते. केवळ संभाजीनगरच नव्हे तर याची व्याप्ती राज्यभर असल्याचं सांगितलं जात आहे. आता यावर ओबीसी मंत्रालयाने कारवाई केली आहे.

मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी विभागाच्या प्रादेशिक उपसंचालकांकडून याबाबतीत खुलासा मागवला आहे. तसेच तत्कालीन सहाय्यक संचालकाविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या शाळा कोणत्या?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील स्वामी विवेकानंद ग्लोबल स्कूल, आसेगाव या शाळेला 100 विद्यार्थ्यांसाठी मान्यता देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्ष भेटीदरम्यान तिथे एकही विद्यार्थी उपस्थित आढळला नाही. वसतिगृह तर अस्तित्वातही नव्हतं. संगणक बंद स्थितीत, खोलीत पूर्ण गोंधळ, आणि संपूर्ण व्यवहार फक्त कागदावरच सुरू असल्याचे दिसून आलं. विशेष म्हणजे, संस्थाचालकाने स्वतःच गेल्या वर्षी या योजनेतून अनुदान मिळाल्याची कबुली दिली.

गॅलेक्सी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ना विद्यार्थी होते, ना वसतिगृह. तरीही या शाळेने 100 विद्यार्थ्यांसाठी मंजुरी घेऊन सरकारी रक्कम उचललेली आहे.

या प्रकारावरून स्पष्ट होतं की, ही योजना प्रत्यक्षात नव्हे, तर फक्त कागदावर चालवली जात आहे आणि त्याच्या आडून शासकीय निधीची खुलेआम लूट सुरू आहे. हा प्रकार केवळ अनुदान लाटण्यापुरता मर्यादित नसून, तो गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काशी आणि त्यांच्या भविष्याशी खेळ करणारा आहे.

बीडमधील संस्थांमध्येही मोठा भ्रष्टाचार

बीड जिल्ह्यातल्या 20 शाळांमध्ये श्रीमंत राजे यशवंतराव होळकर योजनेच्या वसतिगृहास मान्यता आहे. मात्र या योजनेचे निकष केवळ कागदावरच असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बीड तालुक्यातील तुलसी इंग्लिश स्कूल संत ज्ञानेश्वर नगर, सिद्धिविनायक इंग्लिश स्कूल लिंबागणेश आणि गोरे इंग्लिश स्कूल चौसाळा या तीन शाळांना एबीपी माझाने भेटी दिल्या.

यातील तुलसी इंग्लिश स्कूल संत ज्ञानेश्वर नगर ही शाळा आणि याचे वसतिगृह बीड शहरात असल्याने 400 विद्यार्थ्यांची मान्यता या वसतिगृहाला आहे. परंतु प्रत्यक्षात 125 ते दीडशे विद्यार्थी इथे दिसून आले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील बोगसगिरीचा प्रकार एबीपी माझाच्या इन्वेस्टीगेशन रिपोर्टमधून समोर आल्यानंतर, बीडमधील संस्थाचालक सध्या अलर्टवर आहेत.

ही बातमी वाचा: