छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने चौका-चौकात सीसीटीव्ही (CCTV) लावण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाच आता शहरातील महत्त्वाच्या चौकांत व सिग्नलवर नव्याने सुमारे 150 अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात आले आहेत. 'स्मार्ट सिटी'तर्फे राबविला जाणारा 'इंटीग्रेटेड सेक्युरिटी अँड सिटी ऑपरेशन्स प्लॅटफॉर्म' (आयस्कोप) प्रकल्पांतर्गत हे कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असून, लवकरच प्रत्यक्षात हे कॅमेरे कार्यरत होणार आहे. विशेष म्हणजे, या कॅमेऱ्यांचा वापर पोलिसांच्या यादीतील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार, अतिरेकी पकडण्यासाठी होणार आहे. वॉन्टेड गुन्हेगार कॅमेऱ्यांमध्ये कैद होताच त्याचा 'अलर्ट' कंट्रोल रुमला मिळणार असून, पोलिसांकडून त्यांना पकडण्यास तत्काळ मदत होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील स्मार्ट सिटीतर्फे अनेक महत्वाच्या चौकात आणि रस्त्यांवर तब्बल 700 सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. या कॅमेऱ्यांचा सर्वाधिक फायदा पोलीस विभागाला होत असून, याचा वापर गुन्हेगारांचा शोध घेण्यासह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी केला जातो. त्यामुळे, शहरातील कॅमेऱ्यांचे कंट्रोल स्मार्ट सिटी कार्यालयातील कंट्रोल रुम आणि पोलिस मुख्यालयातून होत असते. विशेष, म्हणजे यामध्ये आता आणखी आयस्कोप प्रकल्पाअंतर्गत नव्याने 152 कॅमेऱ्यांची भर पडत आहे.
या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना गुन्हेगारांना पकडणे अधिकच सोपे होणार आहे. कारण शहर पोलिसांना इतर जिल्ह्यातून किंवा राज्यातून मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराबाबत सकर्ततेची सूचना मिळाल्यास तो शहरात आल्यास पकडणे सहज शक्य होणार आहे. असे गुन्हेगार शहरात दाखल होताच कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याचा अलर्ट पोलिस कंट्रोलरुमला लगेच मिळणार आहे. एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने कॅमेऱ्यात गुन्हेगारांच्या छायाचित्रांसह त्याची इतर माहिती टाकण्याची सोय आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गुन्हेगार किंवा पोलिसांना हवे असलेले आरोपी दिसताच पोलिसांना अलर्ट मिळणार आहे. तर, शहरातील वेगेवेगळ्या महत्वाच्या चौकात आणि संवेदनशील ठिकाणी असे कॅमेरे बसवले जाणार आहे.
पोलिसांना मिळाले ड्रोन...
नुकतेच पोलीस आयुक्त कार्यालयात 3 ड्रोन प्राप्त झाले आहे. या ड्रोनचा वापर शहरात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवच्या अनुषंगाने व इतर सणाचे अनुषंगाने करण्यात येणार आहे. ड्रोनसाठी पोलीस अंमलदार यांना प्रशिक्षण दिलेले असुन, त्याव्दारे शहरात होणारे महत्वाचे बंदोबस्त, मिरवुणका, सण उत्सव, व शहरात येणारे महत्वाचे व्यक्तीचे बंदोबस्त यावर कडक नजर राहणार आहे. तसेच एखादी गंभीर घटना अथवा दंगल घडल्यास त्याचे सुध्दा ड्रोनचे मदतीने रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे. सध्या शहरात असलेल्या स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत शहर पोलीसांचे सुध्दा स्मार्ट कौशल्य व तंत्रज्ञानाचा वापर करुन गुन्हेगांरावर नजर ठेवण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: