छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोग (Election Commission) सत्तधारी पक्षाच्या दावणीला बांधले गेले असून, त्यांच्या सांगण्यावरून आयोग काम करत असल्याचा आरोप यापूर्वी ठाकरे गटाकडून अनेकदा करण्यात आला आहे. त्यातच आता आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगामार्फत नवीन मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. नवीन मतदार याद्या बनविताना कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेनेच्या (ठाकरे गट) मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येत असल्याचे षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी केले आहे. त्यांच्या या आरोपाने आता राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. 


शिवसेना भवन येथे संपर्कप्रमुख घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. दरम्यान, यावेळी बोलतांना  घोसाळकर म्हणाले की, "मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून पैसे खर्च करून खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीमार्फत घराघरातील मतदारांची नावे, मोबाईल नंबर घेतले जात असून ही सर्व नावे मतदार यादीत समाविष्ट केली जात आहेत. या एजन्सी सत्ताधारी पक्षाच्या आदेशाप्रमाणे काम करतात. मात्र, याचवेळी नवीन मतदार याद्या बनविताना कोणाच्या तरी सांगण्यावरून शिवसेनेच्या (ठाकरे गट) मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येत आहे. त्यामुळे, हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे. तसेच, वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करून घ्यावीत, असे निर्देश संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिले आहे. 


राजकीय वातावरण तापण्याची शक्यता...


शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना आणि पक्ष चिन्ह (बाण) कोणाचा यासाठी निवडणूक आयोगात सुनावणी झाली. यावेळी निकाल देताना निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाले दिले होते. त्यामुळे, निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला होता. विशेष म्हणजे खुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली होती. असे असतानाच आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये ठाकरे गटाच्या मतदारांची नावे वगळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे, यावरून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे. तर, ठाकरे गटाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) नेत्यांची देखील यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


'जय भवानी, जय शिवाजी' म्हणत मतदान करा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन, निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचा आरोप