गंगापूर : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar Accident News) गंगापूर तालुक्यातील लासुरगावात खदानीतील पाण्याचा अंदाज आला नसल्याने पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मयूर किशोर मोईन (१५) आणि साहिल संतोष झाल्टे (१५) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मृत दोघेही महालगाव येथील न्यू हायस्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकत होते.ते दोघे पोहण्यासाठी खदानीत उतरले होते. ही दुर्दैवी घटना काल (शनिवारी दि.११) दुपारी गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारात घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.(Chhatrapati Sambhajinagar Accident News)
Chhatrapati Sambhajinagar: मुलांचे दप्तर, चपला, कपडे घटनास्थळी
वैजापूर तालुक्यातील भगूर येथील मयूर व साहिल हे महालगाव येथील न्यू हायस्कूल शाळेत इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होते. दोघेही रोज भगूर ते महालगाव असे येऊन-जाऊन करायचे. शनिवारी पेपर दिल्यानंतर मयूर व साहिल गंगापूर तालुक्यातील नरहरी रांजणगाव शिवारात असलेल्या गट क्र. २०४ मधील उषा कुंजबिहारी अग्रवाल यांच्या शेतातील बंद पडलेल्या खदानीत दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मयूरच्या पश्चात आई-वडील, मोठी बहीण, आजी आजोबा असा परिवार आहे. तर साहिलच्या पश्चात आई-वडील असा परिवार आहे. या घटनेनं दोघांच्या कुंटूबावर शोककळा पसरली आहे. मुलांचे दप्तर, चपला, कपडे घटनास्थळी आढळले.
Chhatrapati Sambhajinagar: प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले
मयूर आणि साहिल हे दोघेही खदानीत उतरले असता पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. काही वेळानंतर स्थानिक गुरे चारणाऱ्या नागरिकांना खदानीच्या कडेला शाळेची दप्तरं, चपला, कपडे पडलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ ही माहिती पोलिस पाटलांना दिली. यानंतर पोलिस पाटलांनी शिल्लेगाव पोलिसांना घटनेची माहिती कळवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली; मात्र सुरुवातीला दोघेही सापडले नाहीत. अखेर सायंकाळी सुमारास छत्रपती संभाजीनगर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
Chhatrapati Sambhajinagar: साहिल कुटुंबात तो एकुलता एक; बहिणीचाही दिड वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू
मूळ येवला तालुक्यातील असलेला साहिल झाल्टेचा परिवार गेल्या दहा वर्षांपासून भगूर येथे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. दहा वर्षांपूर्वी झालेल्या दुर्दैवी अपघातात साहिलची केवळ दीड वर्षांची बहीण जळून मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळे साहिल हा कुटुंबातील एकुलता एक आधार होता. मात्र आता त्याच्याही मृत्यूने झाल्टे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साहिलच्या आईचा हंबरडा आणि आक्रोश मन हेलावणारा होता.