औरंगाबाद : परीक्षा केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार तलाठी भरती परीक्षेत (Talathi Bharti Exam) घडल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये (Aurangabad) उघडकीस आला आहे. औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्रात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या बाहेरुन राजू भीमराव नागरे (वय 29 वर्षे, रा. कातराबाद, औरंगाबाद)  नावाच्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला होता. औरंगाबाद शहर पोलिसांकडून (Aurangabad City Police) याचा तपास सुरु असतानाच आता यात परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यात एक महिला आरोपीचा देखील समावेश आहे. तर परीक्षा केंद्रात हाऊसकीपिंग म्हणून काम करणारी ही महिला आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने कॉपी पुरवत असल्याचे समोर आले आहेत. यासाठी त्यांना 3 लाख रुपये मिळत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख युनूस शेख (वय 27 वर्षे, रा. वैजापूर), पवन सुरेश शिरसाठ (वय 26 वर्षे, रा. सिडको) आणि बाली रमेश हिवराळे (वय 30 वर्षे, रा. ब्रिजवाडी) अशी या परीक्षा केंद्रात कॉपी पुरवणाऱ्या आरोपींची नावे आहेत. यातील शाहरुख आणि पवन हे दोघे परीक्षा केंद्रातील टीसीएसचा कंत्राटी पर्यवेक्षक म्हणून काम करायचे. बाली हिवराळे सफाई काम करायची. तर, 5 सप्टेंबरला पोलिसांनी परीक्षा केंद्राच्या बाहेरुन ताब्यात घेतलेला नागरे हा पर्यवेक्षक शाहरुखला परीक्षेच्या आदल्या दिवशी मोबाईल पुरवत होता. सोबतच परीक्षार्थीचा परीक्षा क्रमांक दिला जात होता. त्यानंतर शेख हा मोबाईल सफाई कर्मचारी बाली हिवाळे हिला देत होता. त्यावर परीक्षेची उत्तरे येत होती. ही उत्तरे एका कागदावर लिहून बाली ही शाहरुखला देत होती. त्यानंतर शाहरुख ती उत्तरे संबंधित परीक्षार्थीला देत होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. 


थेट मंत्रालयापर्यंत धागेदोरे? 


तलाठी भरती घोटाळा प्रकरण वाटते तेवढ छोटे नसून यात अनेक मोठे मासे असण्याची शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारण 5 सप्टेंबरला पोलिसांनी औरंगाबादच्या आय ऑन डिजीटल परीक्षा केंद्राच्या बाहेरुन राजू नागरे याला अटक केली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर पोलिसांना थेट मंत्रालयातून फोनाफोनी सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक मोठे मासे असण्याची शक्यता पोलिसांना आहे. तर पोलिसांच्या तपासात या प्रकरणात आणखी कोणकोणती नावं समोर येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


तलाठी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत; आरोपीला अटक करताच थेट मंत्रालयातून फोनाफोनी