छत्रपती संभाजीनगर: सध्या राज्यात तापमानाचा जोर वाढला असून उन्हाळ्यापासून, उकाड्यापासून काहीसा गारवा मिळवण्यासाठी नागरिक शीतपेय पिताना दिसून येतात, यासह उन्हापासून बचाव करण्यासाठी कुणी, शेतातीत तळ्यात, कुणी नदीवर, कुणी धरणा परिसरात जाऊन पोहण्याचा आनंद घेतानाही दिसून येतात. मात्र, गेल्या तीन दिवसांत पाण्यात बुडून (Drowned) 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर येथील नदीत बुडून बाप लेकीचा मृत्यू झाला होता, पुण्यातील शेततळ्यात बुडूनही तिघांचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. तर आज संभाजीनगरमध्येही (Sambhajinagar) तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. टेंभापुरी धरणात (Dam) पोहायला गेलेल्या 9 जणांपैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर 6 जण सुदैवाने बचावले आहेत.
शहराजवळील वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत टेंभापुरी धरणात आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. येथील धरण परिसरात सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास तीन तरुण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत, माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर, अग्निशमन दलाच्या मदतीने पाण्यात बुडालेल्यांना तरुणांना बाहेर काढण्यात आले. शैलेश जोगदंड (रा. परभणी), शैलेश हेलसकर आणि अविष्कार लोखंडे (रा. नांदेड) या तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सर्वजण अंदाजे 25 ते 30 वयोगटातील असून सध्या रांजणगाव शेपू वाळूज एमआयडीसी, वाळूज येथे कंपनीत काम करत होते. कामगार दिनानिमित्ताने आज सुट्टी असल्याने ते धरण परिसरात पर्यटन, पोहण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एकूण 9 तरुण टेंभापुरी येथील धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यापैकी तीन जण पाण्यात बुडाले, तर उर्वरित सहा जण सुखरूप आहेत.
चंद्रपुरात तिघांचा मृत्यू
चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ असलेल्या वर्धा नदीच्या घाटावरील ही घटना असून या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतकांमध्ये राजू कोडापे (40), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (12) आणि भाची प्रियांका मडावी (14 वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदी पात्राकडे धाव घेतली. त्यानंतर, पोलीस (Police) आणि प्रशासनाला माहिती देण्यात आली असून बुडालेल्यांसाठी शोधमोहिम राबविण्यात येत आहे.
जुन्नरमध्ये बुडून दोघांचा मृत्यू
पुण्यातील जुन्नर येथे आजच शेततळ्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली होता. आता, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीवरही तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या दरम्यान 6 ते 7 जण कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी, मृतकांपैकी दोन मुली आंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अचानक त्या बुडू लागल्या, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडिल राजू कोडापे यांनीही नदीपात्रात उडी घेतली, मात्र त्यांचाही मृत्यू झाला.
