छ. संभाजीनगर : पुनर्निर्माण किंवा बांधकामाच्या ठिकाणी अनेकदा काळजी न घेतल्याने किंवा निष्काळजीपणामुळे अपघाताच्या (Accident) घटना घडतात. त्यामुळेच, बांधकाम कामगारांना आवश्यक ते साहित्य पुरवले जाते, बांधकाम करताना आजुबाजूच्या नागरिकांना किंवा संस्थांना त्रास होणार नाही, याची देखील दखल घ्यावी लागते. मात्र, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडून खबरदारी न घेतल्याने अपघात घडल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगर येथे घडली आहे. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यात, पार्किंगसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका खासगी भूखंडावर सुरू असलेल्या बांधकामातील निष्काळजीपणामुळे दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेनं परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. या घटनेतील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. मात्र, सदर भूखंडावर अंडरग्राऊंड पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होते. हे खोदकाम इतकं खोल केलं गेलं होतं की जमिनीतून झरे उघडे पडून सतत पाण्याचा प्रवाह सुरू राहिला. परिणामी, खोदलेल्या जागेतील खड्ड्यात खोल पाणी साचलं. दुर्दैवाने या पाण्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नसून अधिक तपास सुरू आहे.
संभाजीनगर पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी
छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असून 6 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून हैदराबादस्थित व्यापाऱ्याला दीड लाख रुपयांत विक्री करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. गुजरातमधील अहमदाबादच्या ढोलका परिसरातून सहा महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून हैदराबादस्थित व्यापाऱ्याला दीड लाख रुपयांत विक्रीचा सौदा ठरला होता. मुलीचे अपहरण केल्यावर आरोपी छत्रपती संभाजीनगर मार्गे रेल्वेने हैदराबादला निघाले होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासातून आरोपी महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्याचे निष्पन्न होताच गुजरात पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या. त्यानंतर पथक तातडीने रेल्वे स्थानकावर पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजच्या वर्णनावरून आरोपी मनीषा, बिमलसोबत जयेशही मिळून आला. त्यानंतर चिमुकलीला ताब्यात घेत सर्वांना अटक करण्यात आल्याची माहिती संभाजीनगरचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार, यांनी दिली.
हेही वाचा
संतापजनक! लोकलमध्ये महिलांच्या डब्यात पोलीस शिपायाचं अश्लील वर्तन; दारू पिऊन उद्धटपणा, अरेरावी