Rain Update : यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यात जुलै महिन्यात तुरळक पाऊस (Rain) झाला. त्यात आता ऑगस्ट महिना देखील कोरडा जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची दडी पाहायला मिळत असून, हवामान विभागाच्या अंदाजानंतर देखील पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, 'अब तो ना गरजता है, ना बरसता है' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 


जुलै महिन्यात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली व पिकाची उगवण ही झाली. परंतु, गेल्या वीस दिवसांपासून पाऊस न पडल्याने आणि कडक उन्हामुळे पिके सुकू लागली आहेत. पावसाळा सुरू असून चार नक्षत्र संपले असतांना देखील अपेक्षित पाऊस पडतांना दिसत नाही. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात देखील अशीच काही परिस्थिती आहे. नांदेड जिल्ह्यातील काही भाग सोडल्यास विभागात अजूनही जोरदार पाऊस झालेला नाही. मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यात तब्बल 71.7 टक्के पावसाची तुट आहे. त्यात आता ऑगस्ट महिना संपण्यासाठी फक्त 9 दिवस शिल्लक राहिले असून, त्यानंतर पावसाचा एकच महिना बाकी राहणार आहे. 


आता अपेक्षा फक्त पावसाची...


जून महिना सुरु झाल्यापासून जमिनीत खोलवर ओल करणारा एकही मोठा पाऊस अद्याप झाला नाही. त्यामुळे शेत शिवारातील पाणीटंचाईच्या समस्येत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. दिवसभर पावसाळी वातावरण तर कधी ऊन व गर्मी असते पण पाऊस पडतच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागले आहेत. खरीप पिकात वाढलेले तण काढण्यासाठी खुरपणी, कोळपणी यांची कामे झाली आहे. आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. 


दिवसभर ढगाळ वातावरण...


मराठवाड्यात रविवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे जोरदार पावसाची अपेक्षा होती. अनेक भागात दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. पण प्रत्यक्षात पाऊस झालाच नाही. तर आज औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात सकाळपासून कुठे ऊन तर कुठे ढगाळ वातावरण दिसत आहे. त्यामुळे पावसाचे वातावरण निर्माण होत आहे, पण पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. तर, या आठवड्यात चांगला पाऊस न झाल्यास अनेक ठिकाणी खरीपाचे पिकं वाया जाण्याची भीती आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Rain : मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज