Sambhaji Bhide in Aurangabad : गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असलेले संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा आज औरंगाबाद (Aurangabad) शहरात कार्यक्रम होणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. मात्र तरीही हा कार्यक्रम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने या कार्यक्रमाला विरोध केला आहे. भिडे यांचा औरंगाबाद शहरात कार्यक्रम झाल्यास तो हाणून पाडू असा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाने भिडे यांच्या कार्यक्रमाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी भिडे औरंगाबादमध्ये आले तर ते परत कसे जातात ते आम्ही पाहतो, असा इशाराच ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे चर्चेत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरापासून भिडे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्यांची जणू मालिकाच सुरू आहे. कधी 15 ऑगस्ट साजरा करू नका म्हणतात, तर कधी महात्मा गांधींचे वडील मुस्लिम असल्याचा दावा करतात. त्यातच आता संभाजी भिडे यांनी थेट साई बाबांबद्दलच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. तर भिडेंना अटक करण्याची मागणी सुद्धा होत आहे. त्यातच आता भिडे यांचा औरंगाबादमध्ये आज कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात गंगापूरमध्ये देखील भिडे यांचा कार्यक्रम झाला होता. विशेष म्हणजे त्या ठिकाणी देखील पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारूनही भिडे यांचा कार्यक्रम झाला होता. 


भिडेंना शिवसेना स्टाईल उत्तर देऊ!


संभाजी भिडे यांच्या औरंगाबाद दौऱ्याला ठाकरे गटाच्या शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. ठाकरे गटाचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी भिडेंचा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. "अशा नालायक माणसाचं तुम्ही मार्गदर्शन तरी कसं ठेवता. त्यामुळे आयोजकांना देखील पोलिसांनी तंबी दिली पाहिजे. भिडे यांच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचा विरोध असून शिवसेना यासाठी सर्वात पुढे असेल. जर संभाजी भिडे आज शहरात आले, तर शिवसेना स्टाईल त्यांना उत्तर देण्यात येईल. तसेच संभाजी भिडे शहरात आले तर परत कसे जाणार हे आम्ही पाहतो," असा थेट इशारा घोडेले यांनी दिला आहे.


पोलिसांनी परवानगी नाकारली


औरंगाबाद शहरात आज पाच वाजता कॅनॉट परिसरातील अग्रेसन भवन येथे संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, आयोजकांना पोलिसांनी लेखी पत्र देऊन परवानगी नाकारली आहे.  काँग्रेससह इतर संघटनांनी उद्या होणारा भिडे गुरुजींचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र पोलिसांनी आयोजकांना पाठवले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


संभाजी भिडेंच्या औरंगाबादमधील उद्याच्या कार्यक्रमाची पोलिसांनी परवानगी नाकारली; कॉंग्रेसकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा