Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे भारत विकास संकल्प संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांची प्रमुख उपस्थिती होती. मात्र, याच कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी कांदा आणि मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरून कराड यांच्या प्रश्नाची सरबती केली. तसेच आरक्षणाच्या मागणीवरून तरुणांनी आक्रमक भूमिका घेताच पोलिसांकडून त्यांची धरपकड करण्यात आली. शेवटी हा सर्व गोंधळ पाहता कराड यांनी आपले भाषण संपवून कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे आज भारत विकास संकल्प संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. यात्रेचे उद्घाटन केंद्रीय राज्य मंत्री डॉ भागवत कराड यांनी केले. केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती डॉ. कराड यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली. शिऊर येथे विविध विकास कामासाठी 30 लाखांचा निधी दिल्याचे देखील जाहीर केले. दरम्यान याचवेळी कांद्याच्या दरावरून एका शेतकऱ्याने कराड यांना जाब विचारला, यासह महिला बचत गटाच्या समस्या महिलांनी मांडल्या. कार्यक्रमाच्या सरते शेवटी मराठा आरक्षण संदर्भात युवकांनी आक्रमक भूमिका घेण्याचा प्रयत्न केल्याने डॉ. कराड यांनी आपल्या भाषणाला विराम देत पुढील कार्यक्रमाला रवाना झाले. विशेष म्हणजे, यावेळी मराठा आरक्षणावरून प्रश्न विचारणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून अडवत ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना मराठा आरक्षणाच्या मागणीवरून गावात प्रवेश करण्यास विरोध केला जात आहे. याबाबत अनेक गावात तसे पोस्टर देखील लावण्यात आले आहे. असे असतांना भागवत कराड यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारत विकास संकल्प संवाद यात्रेचे आयोजन केले जात आहे. यानिमित्ताने ते वेगवेगळ्या गावाचा दौरा करत आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता भागवत कराड यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आधीपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर,मराठा आरक्षणावरून तरुण आक्रमक होताच, पोलिसांनी या तरुणाला रोखत ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा बैठक...
मंगळवारी संभाजीनगर शहरातील स्मार्ट सिटी कार्यालयात मंत्री कराड यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, "महानगरातील गॅस पाइपलाइन योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गोदावरी नदी पात्राखाली 20 मीटर खोल पाइपलाइन टाकण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अहमदनगर, नेवासा फाटा, गंगापूर, वाळूज मार्गे महानगरात येणाऱ्या गॅस पाइपलाइनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, तसेच कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सरकार सहकार्य करेल," असे एमजेपीसह कंत्राटदारांना बोलतांना डॉ. कराड यांनी स्पष्ट केले.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठा आंदोलक आक्रमक, भाजप आमदारला पिटाळून लावले, गाडीवर हल्ला करण्याचाही प्रयत्न