छत्रपती संभाजीनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याचा दौरा करत आहेत. मात्र, त्यापूर्वीच शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. "गेल्या लोकसभा निवडणुकीत युती असतांना देखील भाजपच्या नेत्यांनी ठरवून माझा प्रभाव केला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. तर, "भाजपने शिवसेनेचं काम केले होते, मात्र खैरे स्वतःच्या निष्क्रीयतेमुळे पराभूत झाले होते, असा पलटवार शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे (Sandipan Bhumre)  यांनी केला आहे. 


आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. दरम्यान, खैरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करत मागील लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभावाला भाजपच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. “गत निवडणुकीत माझा पराभव भाजपाने केला. तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ठरवून माझा पराभव केला. त्यांच्या जावयासाठी अर्धे भाजपचे लोक काम करत होते असा आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. 


चंद्रकांत खैरेंना भुमरेंचं प्रत्युत्तर...


भाजपने लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचेच काम केले होते, मात्र खैरे स्वतःच्या निष्क्रीयतेमुळे पराभूत झाले होते. छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा ही शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप महायुती लढणार आहे. आज उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत, मात्र उद्धव ठाकरे कितीही सुटले तरी त्यांचा आता काही राहिलं नाही. छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार हे महायुतीचा असेल आणि तो उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुती एकत्रितपणे प्रयत्न करेल. 


उद्धव ठाकरेंचा दौरा...


छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार देखील शिवसेनेचे निवडून आले होते. तसेच, लोकसभा निवडणुकीत देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने 2014 पर्यंत सलग चार वेळा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. तसेच मागील 30 वर्षांपासून महानगरपालिकेची सत्ता देखील शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात होती. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे संभाजीनगरचा दौरा करत आहेत. आपल्या याच सभेतून ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. तर, छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सभेत उद्धव ठाकरे याबाबत काही अधिकृत घोषणा करतात का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; एकाच दिवशी चार 'सभा'