छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाच्या देण्याची मागणी करत पुन्हा एकदा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “मराठा आमदार, मंत्र्यांकडून फडणवीसांना मराठ्यांची जिरवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांना माझी विनंती आहे की, फडणवीस मराठा समाजावर दडपशाही करायला लागले आहे. त्यांना थांबवा अन्यथा आम्हाला नाईलाजाने न्यायालयात जावे लागेल," असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “ फडणवीस म्हणतात ना मला गुतवायच आहे, तर गुतुद्या,  कालपासून मराठ्यांनी तालुक्या तालुक्यात बैठका घेणे सुरू केले आहे. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका, अजूनही वेळ गेलेली नाही. फडणवीस साहेब आमचे मराठे अमच्याच अंगावर घालू नका, मराठ्यांवर चाल करून येऊ नका, पूर्वी चाल करायचे आता तसे करू नका" असे जरांगे म्हणाले. 


दडपशाही, गुंडगिरी करण्यासाठी पद दिलेलं नाही


देवेंद्र फडणवीस तुम्हाला माझी विनंती आहे, आमचं तुमचं शत्रुत्व नाही. ठरलेल्या मागण्या मान्य करा. आंतरवाली येथे संचारबंदी लावण्यासाठी आता काय झालं, का दडपण आणत आहात. आंतरवाली येथील संचार बंदी उठवा. संचारबंदी लावून दडपशाही, गुंडगिरी करण्यासाठी पद दिलेलं नाही. जर तुम्ही शांत केले नाही, तर तुमच्यावरील विश्वास देखील तुटेल. गृहमंत्री असा नसावा, जो दडपशाही करून गुंडगिरी करतो. त्यांच्या (फडणवीस) मनात मराठ्याविषयी खुन्नस आहे, असेही जरांगे म्हणाले आहेत. 


भाजप महिला नेत्या जरांगेंच्या भेटीला...


मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, आज अचानक भाजपच्या महिला पदाधिकारी या रुग्णालयात पोहचल्या. “काही कार्यकर्ते सोशल मीडियावरून महिलांना शिवीगाळ करतात" अशी तक्रार त्यांनी जरांगे यांच्याकडे केली. तसेच, अशा कार्यकर्त्यांना सूचना देण्याची विंनती देखील केली. दरम्यान, असे प्रकार चुकीचे असून, महिलांना शिवीगाळ करण्याच्या घटनेचे समर्थन होणारच नाही असे जरांगे म्हणाले. 


पुन्हा आंतरवालीला जाणार...


मनोज जरांगे यांच्यावर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज त्यांची रुग्णालयातून सुट्टी होणार आहे. त्यानंतर जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवालीला जाणार आहेत. दोन दिवस तिथे राहून, त्यानंतर पुन्हा एकदा राज्याचा दौरा करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात जरांगे कोणावर हल्लाबोल करणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


गावागावात व्हॉट्सअप ग्रुप करा, प्रत्येक तालुक्यात मराठ्यांच्या बैठका; डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी दंड थोपटले