छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मुद्दा तापला असतानाच मंगळवारी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात ब्राम्हण समाजाचा (Brahmin Community) मोर्चा निघाला. त्यात आता मुस्लीम समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहे. यासाठी 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मंत्रालय असा 20 दिवसांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मुस्लीम आरक्षण (Muslim Reservation) आणि भारतीय संविधान वाचवा या दोन प्रमुख मागण्या यावेळी आंदोलकांच्या असणार आहे.
मुस्लिम इत्तेहाद आघाडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुस्लीम आरक्षण आणि भारतीय संविधान वाचवण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मंत्रालय असा 20 दिवसांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी नमाजनंतर शहरातून या लाँग मार्चला सुरुवात होईल अशी माहिती मुस्लिम इत्तेहाद आघाडीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक जावेद कुरेशी यांनी दिली. महाराष्ट्र अल्पसंख्याक परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार सिराज देशमुख हे या लाँग मार्चला मार्गदर्शन करतील. यामध्ये 100 व्यक्ती सहभागी होत असून छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडून अधिकृत परवानगीही घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस विभागाकडे अर्ज देण्यात आले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणीचे पत्र दिले जाणार आहे.
न्यायालयाने मुस्लीम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला असतांना, मुस्लिमांना या आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे याच मागणीसाठी आता मुस्लीम समाज पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. मुस्लीम आरक्षण आणि भारतीय संविधान वाचवा या मागण्यांसाठी शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मंत्रालय असा 20 दिवसांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या लाँग मार्च अंतर्गत दररोज 20 किमी पायी चालणार आहे. दर 20 किमी नंतर पुढील मुक्काम व बैठक होईल. मुस्लिम आरक्षणाची गरज आणि सद्यस्थितीत संविधानाचे रक्षण करण्याची गरज स्थानिक रहिवाशांना करून दिली जाणार आहे. लाँगमार्चमध्ये सहभागी लोकांचे खाण्यापिण्याचे साहित्य व्यवस्थापनासोबतच एक रुग्णवाहिका आणि एक डॉक्टरही ठेवण्यात येणार असल्याची माहिती जावेद कुरेशी यांनी दिली आहे.
राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला...
मागील काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाकडून ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केली जात असून, याला ओबीसींचा विरोध आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी हे दोन्ही समाज आमने-सामने आले आहेत. अशातच आता मुस्लीम समाज देखील आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत देखील आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: