Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar) शासकीय घाटी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळासाठी औषध (Medicine) आणायचे असल्याचे सांगून एका महिलेने दुसऱ्या महिलेकडे आपले आठ महिन्यांच्या बाळाला देऊन पळ काढला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. दरम्यान आता पोलिसांकडून बाळाला सोडून फरार झालेल्या आईचा शोध घेतला जात आहे. 


अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 27 जवळ चेहऱ्याला स्कार्फ बांधलेली एक महिला बसलेली होती. तिच्या जवळ एक 8 महिन्यांचे बाळ देखील होते. दरम्यान, तिथेच उभा असलेल्या एका महिलेकडे तिने औषधी आणण्याच्या बहाण्याने बाळ सोपवले. माझ्या बाळाला सांभाळा औषधी घेऊन लगेच येते, असे सांगत ती बाळाला सोडून गेली. परंतु, बराच वेळ होऊनही बाळाची आई परत आली नसल्याने महिलेने तिचा शोधाशोध केली. पण ती कुठे दिसली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने इतरांच्या मदतीने वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.


पोलिसांत तक्रार दाखल... 


आठ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आई पसार झाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक यांना देण्यात आली. त्यानंतर स्थानिक डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाने घाटी परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ज्यात बाळाची आई बाळाला सोडून पसार झाल्याचे समोर आले. त्यामुळे याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तर, यासंदर्भात बेगमपुरा पोलिस ठाणे आणि महिला व बालकल्याण विभागाकडे तक्रार दखल करण्यात आली आहे. तर, बाळ सुरक्षित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 


ओळख लपवण्यासाठी चेहऱ्याला स्कार्फ बांधला... 


शासकीय घाटी रुग्णालयात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. ज्या महिलेकडे आई बाळ सोडून गेली त्या महिलेने संपूर्ण परिसर शोधून काढला, पण बाळाची आई काही सापडली नाही. शेवटी रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली. त्यानुसार, रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 27 जवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यात बाळाची आई आपल्या बाळाला संबंधित महिलेकडे देऊन जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र, आपली ओळख लपवण्यासाठी बाळाच्या आईने चेहऱ्याला स्कार्फ बांधला होता. त्यामुळे तिची ओळख पटवण्यास अडचणी येत आहेत. मात्र, पोलिसांकडून घाटी आणि परिसरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले सर्वच सीसीटीव्ही तपासले जात आहे. त्यामुळे, लवकरच या महिलेचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


संभाजीनगर हादरलं! कॉफी कॅफेमध्येच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नको ते फोटो व्हायरल करण्याचीही दिली धमकी