Marathwada Rain Yellow Alert : जून महिन्यात मराठवाड्यात (Marathwada) पावसाने (Rain) दडी मारली असून, जुलै महिन्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत आहे. अशातच आता मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना आजपासून (12 जुलैपासून) हवामान खात्याने यलो अलर्टचा (Yellow Alert) इशारा दिलाय. 14 जुलैपर्यंत मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, औरंगाबाद, जालना या दोन जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी केला गेला आहे. सोबतच परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात 12 जुलै म्हणजेच एकाच दिवसासाठी येलो अलर्ट असणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात बुधवारी सकाळपर्यंत 8. 2 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे या पावसाने शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र असे असलं तरीही यापूर्वी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज अनेकदा खोटा ठरला आहे. 


विभागातील परिस्थिती...



  • पावसाळा सुरू झाल्यापासून मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने याचे परिणाम पेरण्यांवर झाला आहे.

  • 1 जून ते 12 जुलैपर्यंत विभागातील 66 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून, या भागात पेरण्यांचे प्रमाण अधिक आहे.

  • मराठवाडा विभागातील 11 मोठ्या धरणांमध्ये 45.44 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर आठवड्याभरात फक्त एक टक्का पाणीसाठा वाढला आहे.

  • औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 76.7 टक्के पाऊस झाला आहे.

  • जालना जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 65 टक्के पाऊस झाला आहे.

  • बीड जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 65.5टक्के पाऊस झाला आहे.

  • लातूरमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 43.4 टक्के पाऊस झाला आहे.

  • धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 65.5टक्के पाऊस झाला आहे.

  • नांदेडमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 51.8 टक्के पाऊस झाला आहे.

  • परभणी जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 45.6 टक्के पाऊस झाला आहे.

  • हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 43.1 टक्के पाऊस झाला आहे.


विभागात 467 मंडळांपैकी तब्बल 416 मंडळांमध्ये अत्यल्प पाऊस 


राज्यात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. त्यामुळे जून महिन्यात तसेच जूनपूर्वी होणारा पाऊस झालाच नाही. संपूर्ण जून महिन्यामध्ये सरासरी केवळ सात दिवस पाऊस झाला. जुलै महिन्यात पावसाची अपेक्षा असताना अर्धा महिना संपत आला पण दमदार पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 25, जालना 5, बीड 8, लातूर 9, तर नांदेड जिल्ह्यातील केवळ 4 महसुली मंडळांनी अपेक्षित पावसाची सरासरी ओलांडली आहे. विशेष म्हणजे धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकाही मंडळामध्ये आवश्यक असलेला पाऊस झालेला नाही. त्यामुळे मराठवाडा विभागातील 467 मंडळांपैकी तब्बल 416 मंडळांमध्ये अपेक्षित सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला.


इतर महत्वाच्या बातम्या: 


चिंता वाढली! मराठवाड्यातील 416 मंडळांमध्ये अत्यल्प पाऊस; विभागात पाणीटंचाईची चाहूल