Marathawada Flood : वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील शिऊर गावात शनिवारी मध्यरात्री एक हृदयद्रावक घटना घडली. अचानक तब्येत बिघडलेल्या एका 17 वर्षीय युवतीला रुग्णालयात वेळेत पोहोचविता न आल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सततच्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या विलंबात तिचा अंत झाला. वैष्णवी योगेश जाधव (वय 17) असे मृत युवतीचे नाव असून तिच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Continues below advertisement

वैष्णवी ही शिऊर गावातील योगेश वसंतराव जाधव यांची मुलगी होती. शनिवारी रात्री सुमारास, अडीच वाजता तिची प्रकृती अचानक खालावली. कुटुंबीय आणि नातेवाइकांनी तात्काळ तिला उपचारासाठी जवळच्याच शिऊर बंगला येथील खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी जोरदार पावसामुळे गावातील ओढ्याला मोठा पूर आला होता. यामुळे रस्त्याचा संपर्क पूर्णतः तुटलेला होता.

वाटेतच वैष्णवीचा मृत्यू (Marathawada Flood)

शिवाय, रस्त्यावर खोल खड्डे आणि चिखलाचे साम्राज्य असल्याने कोणतेही वाहन नेणे कठीण बनले. कुटुंबीयांनी शेवटी ट्रॅक्टरच्या सहाय्याने तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, ट्रॅक्टरनेही पूर ओलांडताना वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली. गावकऱ्यांनी दोरीचा आधार घेत तिला ओढ्यापलीकडे पोहोचवले. पण ही जीवघेणी झुंज वैष्णवीसाठी अपुरी ठरली. केवळ 15 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या रुग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल दोन तास लागले. दरम्यानच्या काळात तिची प्रकृती आणखीनच गंभीर होत गेली आणि अखेर वाटेतच तिचा मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Continues below advertisement

10 दिवसांपूर्वीच आजोबांचे निधन (Marathawada Flood)

विशेष म्हणजे, अवघ्या 10 दिवसांपूर्वीच वैष्णवीच्या आजोबांचे निधन झाले होते. त्यानंतर घरात आलेला हा दुसरा मृत्यू असल्याने जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील नागरिकांनी रविवारी दुपारी वैष्णवीवर शोकपूर्वक अंत्यसंस्कार केले. वेळेवर उपचार मिळाले असते, तर युवतीचा जीव वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीचा कहर (Marathawada Flood)

दरम्यान, मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या अतिवृष्टीत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर धाराशिव जिल्ह्यात तीनजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. याशिवाय, नांदेड आणि बीड जिल्ह्यांत प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. या आपत्तीत धाराशिव जिल्ह्यात पाचजण तर बीड जिल्ह्यात एकजण जखमी झाला आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.

आणखी वाचा 

Maharashtra Rain : मराठवाड्यावर आभाळ फाटलं, धरणांच्या विसर्गाने धाकधूक वाढली; गोदावरीला महापूर, शेतकरी हवालदिल