Maratha Kranti Morcha : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावा आणि कोपर्डी अत्याचार घटनेतील (Kopardi Case) आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यात आतापर्यंत 58 शहरात मोर्चे निघाली. तर अजूनही सतत वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन, उपोषण आणि मोर्चे काढले जात आहे. पण, राज्यातील पहिला 'मराठा क्रांती मूक मोर्चा' आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद (Aurangabad) शहरात निघाला होता. लाखोच्या संख्येने जमा झालेल्या मोर्चेकऱ्यांनी रस्त्यावर उतरत समाजाचा आवाज उठवला. पुढे प्रत्येक जिल्ह्यात हे मोर्चे निघाले. विशेष म्हणजे त्यावेळी करण्यात आलेल्या एकूण 15 मागण्यापैकी सात वर्षात फक्त चार मागण्या पूर्ण झाल्या आहेत.
असा निघाला पहिला मोर्चा...
कोपर्डी अत्याचार घटनेनंतर मराठा समाजात मोठा रोष होता. त्यामुळे या घटनेच्या विरोधात मोर्चा काढण्याच्या अनुषंगाने 22 जुलै 2016 रोजी औरंगाबादच्या सिंचन भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला विविध मराठा संघटनांचे एकूण 16 पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी झालेल्या बैठकीत कोपर्डी अत्याचार घटनेच्या विरोधात पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने संघर्ष उभारण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 9 ऑगस्ट 2016 रोजी म्हणजेच क्रांती दिनी मोर्चा काढण्याचे ठरले. 'मराठा क्रांती मोर्चा' असे या मोर्चाला नाव देण्याच ठरलं. तसेच सकाळी साडेअकरा वाजता औरंगाबाद शहरातील क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढायचा ठरले.
दरम्यान, हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी बैठकीत उपस्थितीत असलेल्या सर्वांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. मोर्चाची परवानगी घेण्याच्या जबाबदारीसह, वर्तमानपत्राला बातम्या देण्याची जबाबदारी चार लोकांना देण्यात आली. तसेच दुसरी बैठक 31 जुलैला देवगिरी कॉलेजमध्ये ठेवण्याचे देखील पहिल्या बैठकीत ठरले. तर या दुसऱ्या बैठकीमध्ये राजकीय मंडळींना स्थान द्यायचे नाही असेही ठरले. तसेच कुणाही राजकीय बांधवांना मोर्चामध्ये सहभागी व्हायचे असेल, तर फक्त मराठा म्हणूनच सहभागी होता येईल अशी आचारसंहिता ठरवण्यात आली. हे मान्य असणाऱ्यांनाच मोर्चात सहभागी होता येईल असे जाहीर करण्यात आले.
अन् पाहता-पाहता लाखोचा जनसमुदाय एकत्र आला...
9 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद शहरात मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे कोपर्डी अत्याचार घटनेनंतर मराठा समाजात मोठा रोष आणि संताप त्यावेळी होता. त्यामुळे मोर्चाला गर्दी होईल याचा अंदाज होता. पण, प्रत्यक्षात अपेक्षित गर्दीपेक्षा कितपट तरी अधिकची गर्दी झाली. सकाळी 10 वाजेपासून मोर्चेकरी क्रांती चौकात जमा होण्यास सुरुवात झाली होती. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावागावातून लोक क्रांती चौकात दाखल होत होते. पाहता-पाहता काही वेळेत लाखोंचा जनसमुदाय एकत्र आला.
मराठा क्रांती मोर्चाने दिले शिस्तीचे धडे...
औरंगाबाद शहरात निघालेल्या पहिल्या मराठा क्रांती मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्याप्रमाणात लोक एकत्र आल्याने पोलिसांची देखील चिंता वाढली होती. पण, प्रत्यक्षात मोर्चाचे ज्याप्रमाणे नियोजन करण्यात आले होते, त्यामुळे पोलिसांवर थोडाही ताण पडला नाही. मोर्चा कसा असावा आणि मोर्चातील शिस्तीचे धडे या राज्याला मराठा क्रांती मोर्चाने दिले. विशेष म्हणजे पुढेही राज्यात निघालेले सर्वच 58 मोर्चे असेच शांतेत निघाले. पण, दुर्दैवाने पुढे याच मराठा क्रांती मोर्च्यात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे आरोप झाले आणि तसेच अनेकांनी स्वतः च्या फायद्यासाठी याचा वापर केल्याचे देखील आरोप झाले.
इतर महत्वाच्या बातम्या: