छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहे. यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटीमधून (Antarwali Sarathi) पायी मुंबईकडे (Mumbai) लाखोच्या संख्येने मराठे कूच करतील असेही जरांगे म्हणाले आहे. मात्र, हा मुंबई दौरा कसा असणार, कोणत्या मार्गी मुंबईकडे जाणार, रस्त्यात किती मुक्काम असणार अशा सर्व प्रश्नांची आज उत्तर मिळणार आहे. कारण, या आंदोलनाची रूपरेषा आज माध्यमांद्वारे जाहीर केली जाणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. 


मनोज जरांगे 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत लाखो मराठे देखील सोबत असणार आहे. जरांगे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 10 लाख वाहनं या आंदोलनात असणार आहे. अंदाजे 26 जानेवारीला जरांगे मुंबईत दाखल होतील. मात्र, आंतरवालीमधून निघाल्यावर कोणत्या मार्गाने ते मुंबई गाठणार, किती दिवसांचा प्रवास असणार, रोज किती किलोमीटर चालणार, कोणत्या गावात मुक्काम असणार, तसेच रस्त्यात कुठे सभा होणार का?, या अनेक गोष्टींचा आज खुलासा केला जाणार आहे. तर, आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास होणाऱ्या पत्रकार परिषदेतून मनोज जरांगे आपल्या मुंबई दौऱ्याची रूपरेषा स्पष्ट करणार आहे. 


मुंबईच्या वेशीवर जरांगेंचं भव्य स्वागत होणार...


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी रोजी मुंबईत आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी जरांगे-पाटील आणि मराठा आंदोलक जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा मुंबईच्या वेशीवर उभे राहून स्वतः त्यांचे स्वागत करणार असल्याची घोषणा जनता दल युनायटेडचे आमदार कपिल पाटील यांनी केली आहे. बुधवारी याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी माहिती दिली आहे. 


गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही...


मुंबईत होणाऱ्या आंदोलनावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले आहे की, “मुंग्यासारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहे. सरकारने मारहाण केली केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही. ज्या-ज्या वेळी मी बोलतो, त्या-त्यावेळी ते करतो. आता मुंबईला गेल्यावर माघार घेणार नाही. संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची माझी तयारी आहे. वेळप्रसंगी जीव देखील द्यायची तयारी आहे. मात्र, आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गोरगरीब मराठे मागे हटणार नाही असे जरांगे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : 20 जानेवारीपूर्वी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार, गिरीश महाजनांचा मोठा दावा