Mahavikas Aghadi Sabha : शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडीने राज्यभरात तिन्ही पक्षांची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेतला असून, याची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar City)  होणार आहे. मात्र या सभेच्या टीझरमधून चक्क काँग्रेसचे प्रमुख नेते असलेल्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनाच वगळण्यात आले होते. मात्र 'एबीपी माझा'ने बातमी दाखवताच महाविकास आघाडीचे नेत्यांकडून सावरासावर केली होती. मात्र आता सभेच्या ठिकाणी ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर देखील राहुल गांधींचा फोटो वगळण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून ठाकरे गट त्यांच्यापासून दोन हात लांब राहत असल्याची चर्चा आहे. 


राज्यभरात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभांची सुरुवात 2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर शहरातून होणार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या एकत्र सभेचा टिझर (Teaser)  रिलीज करताना त्यात राहुल गांधी यांना वगळण्यात आले होते. 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी दाखवताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपली बाजू मांडत, हा पहिला टिझर असून यापुढे आणखी टिझर येणार असून त्यात आणखी नेते असतील असे म्हटले होते. मात्र आज सभेच्या ठिकाणी ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या होर्डिंगवर देखील राहुल गांधी यांचा फोटो देखील दिसत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. 


नेमकं काय होर्डिंगवर...


महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उद्या जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेची जोरदार तयारी तीनही पक्षाकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सभेची महत्वाची जबाबदारी ठाकरे गटाकडे आहे. मात्र ठाकरे गटाकडून सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डिंगवर राहुल गांधी यांचाच फोटो वगळण्यात आला आहे. यावर सोनिया गांधी यांचा फोटो आहे, तसेच शरद पवार यांचा देखील फोटो आहे. मात्र राहुल यांचा फोटो वगळण्यात आला आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे देखील फोटो लावण्यात आले आहेत.


सभेपूर्वी कार्यकर्त्यांना दानवेंचं आवाहन!


महाविकास आघाडीची उद्या छत्रपती संभाजी नगर शहरात जाहीर सभा होणार आहे. मात्र सभेपूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीनही पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. ज्यात त्यांनी म्हटल आहे की, मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या वज्रमूठ  सभेला आपण मोठ्याप्रमाणावर उपस्थित राहणार आहोत. मी तीनही पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, या सभेत शांतता बाळगावी. कारण समाजा-समाजामध्ये भांडण लावून सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आपल्याकडून कुठल्याही विधवांश घोषणा, हुल्लडबाजी होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी. येताना शांततेत आणि जाताना शांततेत जायचं आहे,असे आवाहन अंबादास दानवे यांनी केले आहे.