Chhatrapati Sambhaji Nagar Rain News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) शनिवारी (10 जून) दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजता गडगडाट करत जोरदार पावसाला (Rain) सुरुवात झाली. यावेळी ताशी 46.7 कि.मी. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह धो धो पाऊस पडत होता. तर शहरातील काही भागांत गाराही पडल्या. शहरात वाऱ्यामुळे काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. परिणामी अनेक भागातील वीजपुरवठा बंद झाला होता. तर पहिल्याच पावसात महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या नालेसफाईच्या दाव्याचा फज्जा उडाला आहे. तर रात्री साडेआठ वाजेपर्यंत चिकलठाणा शाळेत 25 आणि एमजीएम वेधशाळेत 39.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 


चार ठिकाणी झाडे उन्मळून पडली...


सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरात जोरदार पावसासह वारे सुटले होते. यामुळे वीट्स हॉटेलजवळ, खडकेश्वर सांस्कृतिक मंडळाजवळ, घाटी मेन गेटजवळ आणि शहागंज येथील आदर्श भवनजवळ या चार ठिकाणी झाडे पडले. याबाबतचे रेस्क्यू कॉल आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त होताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन विभाग आणि यांत्रिकी विभाग तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी जेसीबी आणि फायर टेंडरच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला. 


पहिल्याच पावसात नालेसफाईचे पितळ उघड 


दरम्यान शनिवारी झालेल्या पहिल्याच पावसामुळे महानगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पोलखोल झाली आहे. कारण शनिवारी झालेल्या पावसामुळे जय भवानीनगर येथील नाल्याला पूर आला. त्यामुळे परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची धावपळ उडाली. त्यामुळे याची माहिती महानगरपालिकेला देण्यात आली. त्यानंतर यांत्रिकी विभागातर्फे या ठिकाणी जेसीबी पाठवण्यात आले. तर जेसीबीच्या मदतीने साचलेला पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर होते. तब्बल तासाभराने साचलेले पाणी मोकळे करण्यास पथकाला यश मिळाले. 


आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना


पावसाळ्यात जीवितहानी, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा रस्त्यांवर झाडे पडून वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकातर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनचे काम प्रभावीपणे व्हावे आणि याच्यात जास्तीत जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या दृष्टिकोनातून महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्मार्ट सिटी कार्यालयात स्थलांतरित केला आहे. स्मार्ट सिटी येथील कमानंट कंट्रोल रुममध्ये संपूर्ण शहरात काय परिस्थिती आहे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सहजपणे पाहता येते. तसेच यामुळे रेस्क्यू ऑपरेशन तातडीने आणि तत्परतेने हाती घेणे शक्य झाला आहे. याशिवाय मोठी आपत्ती किंवा आग लागल्यावर आपत्तीग्रस्त भागाच्या ड्रोनच्या साह्याने आढावा घेऊन रेस्क्यू ऑपरेशनचे नियोजन करावे असे निर्देश देखील प्रशासक यांनी दिले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: 


छ्त्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पहिला तुफान पाऊस, जोरदार वारेही; रिक्षांवर झाडं उन्मळून पडले