Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) महानगरपालिकेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ड्युटीवर कार्यरत असलेल्या महापालिकेतील एका कर्मचाऱ्याला मृत झाल्याचे समजून त्याचे वेतन रोखण्यात आले. सोबत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांचे वेतन बँकेत जमा झाले. पण आपले वेतन जमा न झाल्याने या कर्मचाऱ्याने संबंधित विभागात विचारणा केल्यावर त्याला धक्काच बसला. कारण मृत पावलेल्या इतर कर्मचाऱ्याच्या नावाऐवजी त्याच्या नावासमोर चुकीने फुली मारण्यात आली होती. त्यामुळे मृत झाल्याचे समजून त्याचं वेतन रोखण्यात आले होते. दरम्यान महानगरपालिकेत हा विषय मोठा चर्चेचा ठरत असून, 'सकाळ'ने याबाबत वृत्त दिले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाकडून वेतनाची यादी लेखा विभागाकडे पाठविताना मृत कर्मचाऱ्यांच्या नावापुढे फुली मारली जाते. पण काही दिवसांपूर्वी मृत झालेल्या कर्मचाऱ्याच्या नावावर फुली मारण्याऐवजी दुसऱ्याच कर्मचाऱ्याच्या नावापुढे शिक्षण विभागाच्या लिपिकाने फुली मारली. त्यामुळे चुकीची फुली मारलेल्या संबंधित कर्मचाऱ्याचे मार्च महिन्याचे वेतन लेखा विभागाने बँकेत जमा केले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्याला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे रमजान सण दोन दिवसांवर आला असताना, देखील आपल्या हक्काच्या वेतनासाठी या कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या कार्यालयात खेट्या माराव्या लागत आहे. 


अन् कर्मचाऱ्याला धक्काच बसला


इतर सहकारी कर्मचाऱ्यांचे वेतन झाले. त्यात ईदनिमित्त सण अग्रीमही त्यांना मिळाला. त्यामुळे आपले वेतन बँकेत जमा का झाले नाही? असा प्रश्न या कर्मचाऱ्याला पडला होता. आपला पगार झाला नसल्याने या कर्मचाऱ्याने महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागात विचारणाही केली. एवढच नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण कोणाकडेच उत्तर नव्हते. शेवटी त्याने लेखा विभागात विचारणा केली असता, तुमच्या विभागाकडून मिळालेल्या यादीनुसार त्यात मृत कर्मचाऱ्यांच्या नावाऐवजी तुमच्या नावावर फुली मारण्यात आली असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे जिवंत असताना देखील आपल्याला मृत घोषित करण्यात आल्याचं आयकून त्या कर्मचाऱ्याला धक्काच बसला. विशेष म्हणजे हा सर्व प्रताप एका लिपिकाने केल्याचे समोर आले. 


अद्याप वेतन नाहीच...


विशेष म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याला अद्याप वेतन देण्यात आलेले नाही. ईदचा सण तोंडावर आलेला असताना प्रशासनाच्या चुकीमुळे या कर्मचाऱ्याला मनस्ताप सहन करावा लागत आहे. मजूर पदावरील हा कर्मचारी सध्या दिव्यांग कक्षात काम करत आहे. त्यामुळे आता वरिष्ठांनी याची दखल घेऊन ईदपूर्वी त्याला वेतन मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar News : आर्थिक फसवणूक झाल्याने तरुणाने चाकूने गळा कापून केली आत्महत्या; संभाजीनगरमधील घटना