Prakash Mahajan On Sushma Andhare : खारघारमध्ये झालेल्या दुर्घटनेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. त्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'हा एक अपघात आहे, या अपघाताचं काय राजकारण करायचं?, अशी प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला होता. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहत त्यांच्यावर टीकाही केली होती. दरम्यान अंधारे यांच्या याच टीकेला आता मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपल्या नेत्याला खूश करण्यासाठी सुषमा अंधारेंकडून राज ठाकरेंवर टीका केली जात असल्याचं महाजन म्हणाले आहेत. 


दरम्यान, यावर बोलताना महाजन म्हणाले की, मला वाटते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून सुषमा अंधारे यांना राज ठाकरेंचं बीट देण्यात आले आहे का?, कारण नसताना त्या राज ठाकरे यांना मधे ओढत असतात. विषय राहिला राज ठाकरे तिथे उशिरा का गेले. तर घटना घडल्यावर लगेच तिथे गेल्याने राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा ताण तेथील व्यवस्थेवर पडला असता. मात्र या सर्व गोष्टी अंधारे यांच्या डोक्याच्या वरच्या आहेत. तर फक्त आपल्या नेत्याला खूश करण्यासाठी सुषमा अंधारेंकडून राज ठाकरेंवर टीका केली जात असल्याचे प्रकाश महाजन म्हणाले.  


पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात मृतदेह गंगेत वाहून गेल्याचं सुषमा अंधारे प्रत्येक सभेत बोलत आहेत. पण गंगेत प्रेत वाहनं ही परंपरा जुनी आहे. कोरोना काळात मात्र ती जास्त झाली असतील. पण महाराष्ट्रात रुग्णवाहिकेत मृतदेहाचा कसा खच पडला होता, हे संपूर्ण माध्यमांनी दाखवलं आहे. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. तर भ्रष्टाचारी लोकं कोण होती, यांचीच लोकं होती. याचं आम्ही कधीही राजकारण केलं नाही. जे काही आहे ते जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं महाजन म्हणाले. 


काय म्हणाले होते राज ठाकरे? 


पालघरमध्ये घडलेल्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, 'कोरोनाच्या काळातही अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेला आहे. तिथेही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आजही भरला जाऊ शकतो. त्यामुळे पालघरमध्ये घडलेल्या घटनेचं राजकारण करू नये. आयोजकांनी सकाळची वेळ घ्यायची नव्हती. हा एक अपघात आहे. या अपघाताचं काय राजकारण करायचं?, असं राज ठाकरे म्हणाले होते.  तर त्यांच्या वक्तव्यावरून सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. ज्याला प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Sushma Andhare : सुषमा अंधारेंचं राज ठाकरेंना खोचक पत्र; विचारले थेट सहा प्रश्न अन् केली राज ठाकरेंची कोंडी