Chhatrapati Sambhaji Nagar News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) नशेखोरीचं प्रमाण वाढलं आहे. मात्र आतापर्यंत बटन नावाच्या नशेच्या गोळीने नशा करणाऱ्यांमध्ये नवीन पद्धत समोर आली आहे. कारण लहान मुलांना खोकल्यासाठी देण्यात येणाऱ्या सिरपचा नशेखोरीसाठी वापर होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या एनडीपीएस पथकाने नशेच्या बाजारात जाणाऱ्या 92 सिरपच्या बाटल्या ताब्यात घेतल्या आहेत. सय्यद सोहेल सय्यद मेहमूद (वय 29 वर्षे, रा. रेल्वे स्टेशन परिसर) आणि शहजाद मंजूर शेख (वय 24 रा. भारतनगर, बिडकीन) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस पथकास दोन अज्ञात व्यक्ती जालाननगर येथील मनपा गार्डन समोर गुंगीकारक आणि नशेसाठी गैरवापर होऊ शकणाऱ्या सिरपच्या बाटल्या विनापरवाना आणइ बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरता रिक्षामधून (क्रमांक MH-20-EF-2218) घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. दरम्यान मिळालेल्या बातमीची खात्री करुन एनडीपीएस पथकाने जालान नगर येथील मनपा गार्डनसमोर औषधी निरीक्षक जि.द. जाधव यांच्यासह सापळा रचला.


यावेळी संशयित रिक्षासह दोघे तिथे आल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नशेसाठी वापर होणाऱ्या गुंगीकारक मोनोकॉफ प्लस कफ सिरपच्या बाटल्या मिळून आल्या. यावेळी या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून या 92 बाटल्यांसह 2 लाख 94 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता दोघांकडे या औषधाबाबतची कुठलीही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन सातारा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (NDPS Act) अधिनियम 1985 कलम 8 (c), 22 (a),22(b), 29 सह कलम 328, 276, भा.द.वि. सह कलम 18 (A), 18 (c), 27 (b) (ii) औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेडिकल चालक यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात 


विशेष म्हणजे सिरपचे औषध डॉक्टराच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाही. ज्या मेडिकलमधून हे औषध विकले गेले त्याला रुग्णाची नोंद करुन घ्यावी लागते. विशेष म्हणजे 42 रुपये किंमत असणारे हे सिरप काळ्याबाजारात 200 रुपयांत मिळते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या औषधाचा नशेसाठी वापर होत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध विकणाऱ्या मेडिकल चालक यांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात यात आणखी काय समोर येते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Talathi : तेलंगणाप्रमाणे महाराष्ट्रही तलाठीमुक्त होणार?; कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय म्हणाले?