Chhatrapati Sambhaji Nagar: मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात 7, 8 आणि 14 ते 20 मार्चदरम्यान झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) तब्बल 1 लाख 53  हजार 947 शेतकऱ्यांच्या (Farmers) 99 हजार 634.47 हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचा दावा केला. तर मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचे दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सोमवारी (20 मार्च) रोजी विभागीय आयुक्तालयाच्या वतीने आठही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र असे असताना देखील 22 मार्चपर्यंत केवळ 26.21 टक्केच पंचनामे पूर्ण होऊ शकले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर संताप पाहायला मिळत आहे. 


सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊनही नुकसानीच्या पंचनाम्याला गती नाही


आधी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात पिकांचे मोठं नुकसान झाले. त्यातच 7, 8 आणि 14 ते 20 मार्चदरम्यान मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने पिके अक्षरशः आडवे झाली आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. असे असताना शासकीय कर्मचारी संपावर गेल्याने पंचनामे रखडले होते. मात्र संप मागे घेतल्यावर देखील नुकसानीच्या पंचनाम्याला गती मिळत नसल्याचे चित्र आहे. कारण मराठवाड्यात कालपर्यंत (22 मार्च) फक्त केवळ 26.21 टक्केच पंचनामे पूर्ण होऊ शकले आहेत. त्यामुळे पंचनामे करण्यासाठी उशीर होत असेल तर नुकसानभरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.