Harshvardhan Jadhav On Raosaheb Danve : दोन दिवसांपूर्वी बीआरएस पक्षात प्रवेश करणाऱ्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी आपले कट्टर विरोधक रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या (Raosaheb Danve) विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षाने आपल्याला संधी दिल्यास कन्नड मतदारसंघातून विधानसभा (संजना जाधव यांच्याविरुद्ध) आणि जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर जाधव विरुद्ध दानवे यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. 


काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये सभा घेऊन राज्याच्या राजकारणात एन्ट्री करणाऱ्या BRS अर्थात भारत राष्ट्र समिती पक्षाकडून आता राज्यात आपला विस्तार वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. दरम्यान याच भारत राष्ट्र समिती पक्षात छत्रपती संभाजीनगरात (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी प्रवेश केला आहे. तर बीआरएसमध्ये प्रवेश करताच जाधव यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाधव म्हणाले आहेत. 


उद्धव ठाकरेंकडून 'नॉट इंटरेस्टेड' उत्तर मिळाले...


दरम्यान बीआरएसमध्ये जाण्यापूर्वी आपण ठाकरे गटात जाण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा देखील जाधव यांनी केला. यावर बोलताना जाधव म्हणाले की, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे ज्यावेळी चिन्ह काढून घेण्यात आले, त्यादिवशी मी खूप भावूक झालो होतो. त्यामुळे मी ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपला ठोकायचं म्हणून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना आगामी लोकसभा निवडणूकीत मदत करणार असल्याचे सांगत त्यांना पाठींबा देखील जाहीर केला. एवढच नाही तर ठाकरे गटाच्या कन्नडचे आमदारांना देखील पाठींबा करायला तयार झालो.  याबाबत माझी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडे पोहोचवली. पण त्यांच्याकडून 'नॉट इंटरेस्टेड' असे उत्तर मिळाले, असे म्हणत जाधव यांनी पत्रकार परिषदेत माजी मंत्री बबनराव घोलप आणि त्यांच्यातील कॉल‌ रेकॉर्डींग ऐकवली.


नामांतरावर प्रतिक्रिया...


दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना जाधव यांनी नामांतराच्या मुद्यावर देखील आपली भूमिका मांडली आहे. 'आक्षेप नोंदवण्याच काय फॅशन आहे, बॉम्बेच मुंबई झाल‌ तेव्हा कोणाकडून आक्षेप घेतला नाही. तुम्ही हिंदुत्ववादी सरकार असून, निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कोणी अडवले आहे. शहराचे काहीही नाव ठेवा, पण नागरिकांना पिण्यासाठी पाणी द्या, रस्ते द्या असे जाधव म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी राजकीय बातमी! रावसाहेब दानवेंचे कट्टर विरोधक हर्षवर्धन जाधवांचा BRS मध्ये प्रवेश