Chhatrapati Sambhaji Nagar News: बुधवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगर शहरातील (Chhatrapati Sambhaji Nagar City) किराडपुरा भागात दोन गटात राडा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल करण्यात आला. रात्री अकरा वाजेपासून घटनास्थळी गेलेले पोलीस रात्रभर हल्लेखोरांशी खिंड लढवत होते. दरम्यान सकाळी माध्यमांमध्ये बातम्या सुरु झाल्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी ते दृश्य पाहिले आणि त्यांची चिंता वाढली. याचवेळी घटनास्थळी बंदोबस्तवर असलेले सिटी चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस.पवार यांच्या पंधरा वर्षाच्या मुलीने बातमी पाहिली आणि थेट वडिलांना फोन लावला. वडील सुखरूप असल्याची खात्री केली. पण घरी परतताच तिने वडिलांना मिठी मारली आणि हंबरडा फोडला. 


छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद झाला. दरम्यान पंधरा वर्षाच्या आश्लेषाचे पोलीस खात्यात शिपाई पदावर असलेले वडील एस.पवार त्याच ठिकाणी नाईट ड्युटीला होते. रात्री झालेला वादाचे दृश्य आश्लेषाने टीव्हीवर पाहिले. त्यामुळे सकाळीच आपल्या वडिलांना फोन करून विचारपूस केली. यावेळी आमची गाडी जाळली असून, काळजी करू नको मी सुरक्षित असल्याचं पवार म्हणाले. मात्र जेव्हा पवार घरी गेले तेव्हा पंधरा वर्षाच्या आश्लेषा हिनं त्यांना मिठी मारली आणि हंबरडा फोडला. आपल्या वडिलांना सुखरूप पाहून तिला झालेला आनंद झाला आणि ती अक्षरशः रडू लागली. मुलीला रडताना पाहून पवार देखील भावूक झाले होते. याचवेळी हा भावूक क्षण त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यामुळे पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करतात हे या घटनेतून समोर आले आहे. 






अन् कुटुंबातील सदस्यांचा जीव भांड्यात पडला...


सिटी चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस.पवार यांची बुधवारी नाईट ड्युटी होती. त्यानुसार ते पोलीस ठाण्यात हजर झाले. दरम्यान रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास किराडपुरा भागात झालेल्या वादाची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी वेगवेगळ्या पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पवार देखील घटनास्थळी गेली. दरम्यान वाद वाढल्यावर मोठा जमाव आला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली.पोलिसांचे वाहने पेटवून दिली. यावेळी पवार यांची पोलीस व्हॅन देखील जळून खाक झाली. रात्री घडलेल्या प्रकाराबाबत सकाळी जेव्हा टीव्हीवर पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बातमी पहिली तेव्हा त्यांचीही चिंता वाढली. त्यांनी पवार यांना फोन लावला असता, त्यांनी सुखरूप असल्याचे कळवले. पण असे असले तरीही जोपर्यंत पवार घरी आले नाही, तोपर्यंत त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना चिंता लागली होती. पण घराच्या दारावर पवार यांना पाहिले आणि कुटुंबातील सदस्यांचा जीव भांड्यात पडला.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरात तीन वेगवेगळ्या टप्प्यात कसा घडला वाद; पोलीस आयुक्तांनी दिली माहिती