Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक)  तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून देण्यात आले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर गुरुवारी (दि. 26 मे) हा प्रकार समोर आला. शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून देणाऱ्या अज्ञात माता-पित्यांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आरोप आई-वडिलांचं शोध घेतला जात आहे. 


पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंमलदार विलास चव्हाण फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 25 मे रोजी ते चालक अनिल पवार  ड्युटीवर होते. दरम्यान त्यांना कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिराजवळील झुडपामध्ये एक बाळ रडत असल्याचा कॉल आला. त्यांमुळे चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तेथे दोन महिला हजर होत्या. त्यांपैकी एकीच्या हातात पाच ते सात दिवसांचे पुरुष अर्भक होते. अधिक माहिती घेतल्यावर हे अर्भक येथील झुडपात फेकून दिल्याचे आढळल्याचे महिलांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अर्भकाला घाटीत दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करीत आहेत.


आरोपींचं पोलिसांकडून शोध सुरु 


शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळ अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक)  तोंडात बोळा कोंबून आणि कॅरिबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून देण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या बालकाच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शनि मंदिराजवळील झुडपात कॅरिबॅगमध्ये गुंडाळलेले अर्भक टाकण्यासाठी नेमके कोण आले असेल? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एक महिला पिशवी घेऊन आली होती. जाताना तिच्याकडे पिशवी नव्हती, अशी माहिती त्या भागातील लोकांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहे. 


बाल कल्याण समितीचे आवाहन...


नको असलेले मूल असे फेकून देणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे पालकांनी गुन्हेगार बनू नये. असे अर्भक बालकल्याण समितीकडे आणून द्यावे. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील. हे बाळ शिशुगृहात ठेवून त्याचे पालन-पोषण केले जाते. योग्य वेळी ते बाळ दत्तक दिले जाते. त्यामुळे बाळाचे भविष्य घडते, असे आवाहन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी केले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar : फौजदार झाल्याने दिवसभर शुभेच्छा स्वीकारल्या; पण लाच घेतल्याने दुसऱ्याच दिवशी पडल्या बेड्या