Chhatrapati Sambhaji Nagar News : जीवनशैली बदलामुळे अनेक वानरांना (Monkey) कर्करोग (Cancer) होत असल्याचे समोर आले असून, छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhaji Nagar) डॉ. संतोष पाटील यांनी हा दावा केला आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये कर्करोग झालेल्या एका वानरावर उपचार करुन त्याला जंगलात पाठवण्यात आले आहे. तर बऱ्याच पर्यटन ठिकाणी पर्यटक माकडांना चिप्स, कुरकुरे आणि इतर पॅक फूड खाण्यासाठी दिले जातात. त्यात असलेले प्रिझर्व्हेटिव्ह हे माकडांना हानिकारक ठरते. त्यामुळे याचे परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होत असून, यामुळे अनेक वानरांना कर्करोग होत असल्याचा दावा डॉ. संतोष पाटील यांनी केला आहे. 


सिल्लोड तालुक्यातील तोंडापूर परिसरातले आणि अजिंठा डोंगर भागात राहणाऱ्या काही तरुणांनी जखमी माकडाला डॉ. संतोष पाटील यांच्याकडे उपचारासाठी आणले होते. यावेळी त्याच्या एक गुदद्वाराला मोठी जखम झालेली होती. यावेळी ही जखम नसून गुदद्वाराचा अॅनो रेक्टल कॅन्सर असल्याचे निदान झाले. त्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता आणि त्यातून दुर्गंधी पण येत होती. त्यामुळे त्यावर योग्य उपचार करुन जखमेतून चार दिवसात दुर्गंध आणि स्त्राव होणे बंद झाले. तसेच निगराणी आणि अधिक उपचारासाठी त्याला जामनेर इथे हलवण्यात आल्याची माहिती डॉ. संतोष पाटील यांनी दिली आहे. 


माणसांचा हस्तक्षेप वाढला...


माणसांचा हस्तक्षेप जंगलात वाढत चालला आहे. शिवाय वर्षातून सहा महिने जंगलामध्ये वांनरांना पाणी आणि खाण्यासाठी अन्न मिळत नाही. त्यामुळे त्यांची धाव ही रस्त्यावर किंवा गावांमध्ये सुरु आहे. अशात रस्त्यावर असलेल्या किंवा गावात आलेल्या वानरांना माकडांना कुरकुरे, चिप्स, वेगवेगळे बिस्किटे, पोळी टाकले जाते आणि वानर देखील ते खात असतात. विशेष म्हणजे पोळी सुद्धा त्यांच्यासाठी हानिकारक आहे. कारण त्यात ग्लूटेन असते आणि ते पचवणे माकडाला जड जाते. त्यामुळे मानवी वस्तीशी संपर्क येणाऱ्या वानरांना देखील जीवनशैली बदलाचं फटका बसत असल्याचे डॉ. संतोष पाटील म्हणाले. 


जीवनशैली बदलाचे बळी आता माकड 


माकडामध्ये गुदद्वाराचा अॅनो-रेक्टल कॅन्सर हा प्रकार तुलनेत वाढत आहे. सिमीयन पापीलोमा व्हायरस (एसपीव्ही) यासाठी मुख्य कारण आहे. माणसांमध्ये जसा ह्यूमन पापीलोमा व्हायरस अॅनो-रेक्टल कॅन्सरला हा विषाणू कारणीभूत ठरत आहे. तसे माकड वंश म्हणजे प्रायमेट्समध्ये ही असचं काही घडत आहे. त्यामुळे शिजवेलेला आणि प्रक्रिया केलेला मानवी आहार माकड आणि तत्सम जीवांना देऊ नयेत. त्यांना त्यांचा नैसर्गिक आहार, झाडपालाच योग्य असतो. मात्र बऱ्याच पर्यटन ठिकाणी पर्यटक माकडांना चिप्स, कुरकुरे आणि इतर पॅक फूड, कोल्ड्रिंक, ब्रेड खाण्यासाठी देतात. मात्र त्यात असलेले प्रिझर्व्हेटिव्ह हे माकडांना हानिकारक ठरतात, असेही डॉ. संतोष पाटील म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Marathwada Cabinet Meeting: मराठवाड्यात मंत्री मंडळ बैठकीच्या मागणीसाठी तरुणाचं 'शोले स्टाईल' आंदोलन