Chhatrapati Sambhaji Nagar News: रामनवमीच्या (Ram Navmi 2023) आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील किराडपुरा (Kiradpura) भागात दोन गटांत मध्यरात्री तणाव निर्माण झाला होता. पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. तर घटनास्थळी जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तर घडलेल्या घटनेचा संपूर्ण आढावा घेऊन भुमरे यांनी पोलिसांना काही सूचना केल्या आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील भुमरे यांनी केले आहे. 


दरम्यान यावर बोलताना भुमरे म्हणाले की, रात्री बारा ते एक वाजेच्या दरम्यान दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर जाळपोळ करण्यापर्यंत गेले. दरम्यान या ठिकाणी उभ्या असलेल्या चारचाकी, दुचाकी पेटवून देण्यात आल्या आहेत. रात्रीच परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे सध्या सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. रमजान महिना सुरु असून, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेकर जयंती आहे. तर आज रामनवमी असून, महावीर जयंती देखील आलेली आहे. त्यामुळे हे सर्व सण आपण शांततेत साजरे केले पाहिजे, असे आवाहन भुमरे यांनी केले. 


कोणीही राजकारण करू नयेत


किराडपुरा भागात दोन गटात झालेल्या वादानंतर भुमरे यांनी घटनास्थळी भेट दिली असून, आढावा घेतल्यावर या सर्व घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याची माहिती भुमरे यांनी दिली आहे. तसेच या घटनेवरून कोणीही राजकारण करू नयेत असेही भुमरे म्हणाले.  


घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त... 


शहरातील किराडपुरा भागात रात्री झालेल्या वादानंतर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तर स्वतः पोलीस आयुक्त निखिल गुप्ता घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील शहरातील वेगवेगळ्या भागात लक्ष ठेवून आहे. सध्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, शांतता आहे. तसेच भाविक नेहमीप्रमाणे मंदिरात येऊन दर्शन घेऊन जात आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगर दोन गटात राडा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया