Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजी शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) आज महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) तीनही पक्षाची एकत्र सभा पार पडत आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. शहरात बुधवारी झालेल्या राड्यानंतर ही सभा होत असल्याने याकडे राज्याचे लक्ष लागले. दरम्यान याच सभेत महाविकास आघाडीकडून संविधानाचे (Constitution) पूजन होणार आहे. सभेच्या स्टेजवर तीनही पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत संविधान पूजन होणार आहे. राज्य आणि केंद्र सरकार संविधान न पाळता विरोधकांना हुकुमशाही राबवून संपवण्याचा प्रयत्न करत असल्याने, संविधान पूजन करण्यात येत असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे यावरूनच भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. आधी संविधान सारखं वागावं असा टोला केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी लगावला आहे.
यामुळे करणार संविधानाची पूजा...
महाविकास आघाडीची आज छत्रपती संभाजीनगर शहरात वज्रमुठ सभा होत आहे. तर पहिल्यांदाच या सभेत संविधान पूजन केले जाणार आहे. याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाची निवडणूक आयोगाने भाजपच्या दबावाखाली पक्षाची नोंदणी रद्द करून चिन्ह काढून घेतले आहे. निवडणूक आयोगाने भाजपच्या दबावाखाली ही कारवाई करताना सर्व नियम, कायदे गुंडाळून टाकले आहे. त्यानंतर आता चोर म्हटले म्हणून राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. एवढच नाही तर या शिक्षेनंतर अवघ्या 24 तासात लोकसभेचं सचिवालय राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करतोय. हे सर्व प्रकार घटनेची पायमल्ली करणारे आहे. विरोधकांना चिरडण्यासाठी कायद्याचा वापर केला जात आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेकर यांनी लिहलेली घटनाच धोक्यात आणण्याचा काम केले जात आहे. त्यामुळेच आम्ही संविधानाचं पूजन करणार असल्याचे दानवे म्हणाले.
शिंदे गटासह भाजप नेत्यांकडून टीका
दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री भागवत कराड म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सभेत संविधान पूजन होणार असल्याची चर्चा आहे. पण त्यांनी आधी संविधान सारखं वागलं देखील पाहिजे. जेव्हा आपल्यावर कारवाई होते तेव्हा विरोध करायच आणि बाजूने झालं तर चांगलं म्हणायचं. यांची वज्रमुठ कशाची बांधली जात आहे, तर ती मुठ भ्रष्टाचाराची असल्याचं कराड यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे निवडणूक आयोग असो की, राहुल गांधींवर झालेली कारवाई असो सर्वकाही नियमाने झालं आहे. तसेच भाजप सत्तेसाठी विचारात कधीही बदल करणार नाही, असेही कराड म्हणाले.
दरम्यान यावर बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, शिवसेनेच्या सभेत संविधान पूजन होत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण याचवेळी भारत मातेचं पूजन होणार असल्याने काँग्रेसला हे पटणार नाही. आमचं सरकार घटनेनुसार चालणार आहे. पण यांना हे सरकार नैतिक नसल्याचं वाटत आहे. संविधान पूजन करत आहे ही बाबा चांगली आहे, पण आधी घटनेचा पालन करा. निवडणूक आयोगाने पैसे घेतलं असे म्हणणे योग्य नाही. फक्त संविधानचं दिखावा नसावं. तसेच बाळासाहेब यांचे विचार गाडण्याचं काम उद्या महाविकास आघाडी करणार असून, याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्याचं शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या :
मविआची वज्रमुठ अन् शिवसेना-भाजपची सावरकर गौरव यात्रा; छ. संभाजीनगरमध्ये असा रंगतोय पॉलिटिकल ड्रामा