Chhatrapati Sambhaji Nagar Corona Update: एकीकडे H3N2 व्हायरसमुळे (H3N2 Virus) चिंता वाढली असताना आता पुन्हा एकदा कोरोना (Corona) डोकं वर काढताना पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) तीन दिवसांत 15 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आरोग्य विभागाकडून पुन्हा एकदा कोरोना चाचण्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


H3N2 या कोरोनासदृश विषाणूचा धुमाकूळ सुरु असतानाच शहरात तीन दिवसांमध्ये 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. यापूर्वीची अनुभव पाहता मार्च, एप्रिल व मे महिन्यातच कोरोनाची साथ अधिक तीव्र होती. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी कोरोना उद्रेकाची ही चिन्हे तर नाहीत ना, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे.


संशयित कोरोना रुग्णांची टेस्ट


दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच महानगरपालिकेने प्रत्येक आरोग्य केंद्रावर आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्टची सुविधा सुरु केली. तर संशयित रुग्णांची टेस्ट करण्यात येत असल्याचे माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे. दोन-तीन दिवसांत केलेल्या अँटिजन आणि आरटीपीसीआर चाचण्यामधून 15 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. यातील दोन रुग्ण ग्रामीण भागातील असून 13 रुग्ण शहराच्या विविध भागांतील आहेत. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेत मेल्ट्रॉनमधील उपचार सुविधा सज्ज केली जात आहे. नागरिकांनी गर्दीत वावरताना मास्कचा वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले.


11 जणांना H3N2 व्हायरसचे निदान 


गेल्या दोन महिन्यांपासून H3N2 व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाने आरोग्य विभागाची चिंता वाढली. यासाठी आरोग्य यंत्रणेकडून खबरदारीचे पाऊल उचलण्यात येत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत H3N2 व्हायरसचे 11 रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. मात्र कोणत्याही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा शहरातील आरोग्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


संपाचा फटका! छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील नियोजित 15 शस्त्रक्रिया रद्द; रुग्णांचे हाल